संगमनेर : संगमनेर भूमी अभिलेख कार्यालयातील मेंटेनन्स सर्वेअर पदावर असणाऱ्या समीर उंब्राळकर या माणसाने नागरिकांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास देण्याचे काम चालवले आहे. त्यामुळे नागरिकात प्रचंड मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असून या मेंटेनन्स सर्वेअरची व तेथील अनागोंदी कारभाराची तातडीने चौकशी करण्याची मागणी संगमनेर तालुका शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महसूल मंत्री विखे पाटील यांना पाठवलेल्या निवेदनात कैलास वाकचौरे यांनी म्हटले आहे की संगमनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मेन्टेनन्स सर्वेअर हा नागरिकांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास देण्याचे काम करत आहे. त्याच्या या दुष्कृत्याला सर्वसामान्य नागरिक अक्षरशा वैतागले आहेत. सर्वसामान्य माणसांची कामे करताना प्रचंड प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. सदर अधिकारी हा मोजणीचे प्रकरण असेल तर खातेंदारकाकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतो. वारस नोंद, खरेदी नोंद, गहाणखत या संदर्भात प्रत्यक्ष खातेदारास बोलावून त्यांच्याकडून पैसे घेतल्याशिवाय कुठलेही काम करत नाही. खातेदारास मोबाईल वरून फोन करून बोलावून घ्यायचे व तुमच्या प्रकरणात चुका आहेत त्या दुरुस्त होणार नाहीत त्या दुरुस्त करण्यासाठी मला वरिष्ठांनाही पैसे द्यावे लागतात असे बोलून तो खातेदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळतो तसेच डिजिटल उतारेचे काम पूर्ण करत नाही. त्यात मुद्दाम चुका ठेवून त्या संदर्भात खातेदाराने अर्ज केल्यास त्यास वर्ष, सहा महिने चक्रा मारण्यास लावून आर्थिक मानसिक त्रास दिला जातो. गोरगरीब शेतकरी, अशिक्षित कष्टकरी नागरिक यांच्याबरोबर आरेरावी करून त्यांचे कागदपत्रे फेकून देणे असे प्रकार सतत या कार्यालयात चालू आहेत. मोजणीची सरकारी फी भरून देखील वरतून काम करून घेण्यासाठी व मोजणी नकाशा मिळवण्यासाठी हजारो रुपये लोकांकडून उकळले जात आहेत. या कार्यालयाची वेळ संपल्यानंतरही हा अधिकारी रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत कार्यालयात बसून असतो. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्याची ताबडतोब चौकशी करून त्याचे वर कायदेशीर कारवाई करावी तसेच भूमी अभिलेख कार्यालयातील अनागोंदी कारभाराची देखील चौकशी करावी अशी मागणी कैलास वाकचौरे यांनी महसूल मंत्री विखे पाटील यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनावर माजी जिल्हा उपप्रमुख दिलीप साळगट, सुभाष चव्हाण आदींच्या सह्या आहेत. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचे इंदलकर, नाशिकचे भूमी अभिलेखचे उपसंचालक, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, भूमी अभिलेखचे संगमनेर विभागाचे उपअधीक्षक यांना पाठवले आहेत.
ReplyForward |