: कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
राहुरी विद्यापीठ, दि. 21 सप्टेंबर, 2022
देशी गोवंश संवर्धना सोबत भ्रृण प्रत्यारोपण या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन
आधिक दुग्ध क्षमतेच्या देशी कालवडी निर्माण करणे हि काळाची गरज असून या तंत्रज्ञानाचा
वापर व प्रसार सर्वसामान्य पशुपालकांपर्यंत होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले आहे.
भारतीय गोवंशाचे शास्त्रीयदृष्टया संवर्धन आणि संशोधन गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र
शासनाच्या आर्थिक सहाय्याने पुणे येथील कृषि महाविद्यालयामध्ये देशी गाय संशोधन व
प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. या प्रकल्पात देशी गाईंच्या संवर्धनासोबत भ्रृण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा
अवलंब करुन जातीवंत पैदाशीवर भर दिला जात आहे. या तंत्रज्ञानात गाईच्या स्त्री बीजांडावरुन
स्त्री बीजे काढली जातात व उच्च वंशावळ असलेल्या वळूच्या विर्यासोबत प्रयोगशाळेत फलित
करुन भृण परिपक्व केले जाते. त्यानंतर ऋतूचक्र नियमन केलेल्या कमी दुध देणार्या गाईच्या
गर्भाशयात तो भ्रृण प्रत्यारोपीत करण्यात येते. सुमारे 273 दिवसांनतर त्यापासून अधिक
दुग्धक्षमतेच्या कालवडी उपलब्ध होतात. या तंत्रज्ञानाव्दारे गो संशोधन व विकास प्रकल्प, राहुरी
येथील प्रक्षेत्रावर जन्मलेल्या चार गीर कालवडींची पाहणी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केली.
आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी वेळेत उच्च दुग्धक्षमतेचे देशी गोधन तयार करणे
शक्य आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान सामान्य शेतकरी व
पशुपालकांसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. हे तंत्रज्ञान पशुपालकांपर्यत पोहचविण्याचे आवाहन
डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.