मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास निश्चित केलेले १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य

0

शिर्डी, दि. १५ – मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळख जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, असे आवाहन शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी केले आहे.  शिर्डी विधानसभा मतदारसंघात २७१ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. 

छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), 

निवृत्ती वेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र,  भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र  हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. 

मतदारांना मतदान केंद्रामध्ये मोबाईल बाळगण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे या १२ ओळखपत्रांपैकी कोणत्याही एका ओळखपत्राची मूळ प्रत मतदानावेळी जवळ बाळगावीत, मतदान केंद्रामध्ये मोबाईल आणू नयेत, असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here