मराठा आरक्षण : चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती आणखी बिघडली

0

जालना प्रतिनिधी : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी १७ सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला तीन दिवस झाले असून उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.
आज त्‍यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहे. त्‍यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारला शेवटची संधी असल्याचे म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा थेट इशारा देत शेवटचे अल्टिमेटम दिले. मनोज जरांगे यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा, मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरून सगेसोयऱ्यांनाही आरक्षण द्या आणि हैद्रराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करा. या प्रमुख मागणीसाठी त्‍यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
वारंवार उपोषण करत असल्यामुळे जरांगे यांच्या शरीरात त्राण राहिलं नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगितलं जात आहे. जरांगे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावं म्हणून अनेकांचे प्रयत्नही सुरू आहेत.

मनोज जरांगे यांना प्रचंड थकवा जाणवत आहे. त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यांना गरगरल्या सारखं होत असून दोन पावलंही चालता येत नाही. चालत असतानाच ते मध्येच जमिनीवर बसून घेत आहेत. गुडघ्यात डोकं घालून मनोज जरांगे बराच वेळ बसून राहत आहेत. जरांगे यांची ही केविलवाणी अवस्था पाहून महिलांना अश्रू अनावर झाले आहेत.
माझी शुगर कमी होत होता. कमी होणारी शुगर वाढलीच कशी? असा सवाल करतानाच सरकारचं ऐकून माझा गेम करू नका, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांचं हे सहावं उपोषण आहे. विधानसभा निवडणूकीच्‍या तोंडावर पुन्‍हा एकदा आरक्षणाचा वाद चिघळण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here