महाबळेश्वर पर्यटकांविना उदास; निसर्गरम्यतेला अवकळा, स्थानिक व्यवसाय संकटात..!

0

प्रतापगङ प्रतिनिधी :  महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर सध्या पर्यटकांच्या प्रतीक्षेत असल्याने उदासवाणे झाले आहे. थंड हवा आणि नयनरम्य दृश्यांमुळे वर्षभर पर्यटकांना आकर्षित करणारे हे ठिकाण आता शांत आणि सुनेसुने भासत आहे. मार्च महिना संपून, दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या तरी पर्यटकांची अपेक्षित गर्दी न झाल्याने येथील स्थानिक व्यावसायिक चिंतेत आहेत. आठवड्यातील तुरळक गर्दी वगळता सर्वत्र शुकशुकाट जाणवत असल्याने व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत आहे.

मागील वर्षांमध्ये रमजान ईद झाल्यानंतर आठ ते दहा दिवस पर्यटकांची चांगली वर्दळ असायची आणि त्यानंतर मुख्य पर्यटन हंगामाला सुरुवात व्हायची. मात्र, यावर्षी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. पर्यटकांच्या अभूतपूर्व कमतरतेमुळे महाबळेश्वरमधील हॉटेल्स रिकामी पडली आहेत, तर जगभर प्रसिद्ध असलेल्या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. बाजारात मागणी नसल्याने त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही आणि उत्पादन वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. एका हवालदिल शेतकऱ्याने आपली व्यथा व्यक्त करताना सांगितले, “पर्यटक नसल्यामुळे आमच्या स्ट्रॉबेरी शेतीवर मोठे संकट ओढवले आहे. आम्ही आमचे उत्पादन कोणाला विकावे, हा मोठा प्रश्न आहे.”

फक्त मोठे व्यावसायिकच नव्हे, तर हातावर पोट असणारे छोटे व्यावसायिकही या परिस्थितीमुळे अडचणीत आले आहेत. घोडेवाले, गाईड, टॅक्सी चालक आणि रस्त्यावर छोटे-मोठे व्यवसाय करून गुजारा करणारे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. पर्यटकांची वाट पाहता पाहता त्यांचा रोजचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

महाबळेश्वरमध्ये आर्थर सीट पॉइंट, इको पॉईंट, वेण्णा लेक, लिंगमळा धबधबा, सनसेट पॉईंट, श्री महाबळेश्वर क्षेत्र, पंचगंगा मंदिर यांसारखी जवळपास ३० हून अधिक आकर्षक स्थळे आहेत. नेहमी पर्यटकांच्या गजबजाटाने ओतप्रोत असणारी ही ठिकाणे आज शांत आणि सुनेसुने भासत आहेत. एका हॉटेल मालकाने सांगितले की, “नेहमी पर्यटकांच्या गजबजाटाने भरलेले असलेले महाबळेश्वर आज शांत झाल्याने एक प्रकारची रिक्तता जाणवत आहे. पर्यटकांशिवाय महाबळेश्वरला त्याची ओळखच राहिली नाही.”

महाबळेश्वरला पुन्हा एकदा पर्यटकांचे प्रमुख केंद्र बनवण्यासाठी आता तातडीने आणि एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. स्थानिक प्रशासन आणि व्यावसायिक यांनी एकत्र येऊन पर्यटनाला चालना देण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आखावयास हव्यात. पर्यटकांना चांगल्या सोयीसुविधा पुरवणे, वाहतूक आणि वाहनतळांची व्यवस्था सुधारणे आणि शहराचे विद्रूप झालेले स्वरूप बदलणे आता अत्यावश्यक आहे.

महाबळेश्वरच्या सध्याच्या स्थितीचा गांभीर्याने विचार करून, महाराष्ट्र शासनाने केवळ मुख्य हंगामात आयोजित केलेल्या चार दिवसांच्या पर्यटन कार्यक्रमावर अवलंबून न राहता, वर्षभर पर्यटन वाढीसाठी प्रभावी आणि ठोस उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे. पर्यटकांना केंद्रबिंदू मानून त्यांना पुरेशा सुविधा देणे, वाहनतळांची योग्य व्यवस्था करणे आणि शहराचे सौंदर्य जपणे ही काळाची गरज आहे. तरच महाबळेश्वर पुन्हा एकदा पर्यटकांच्या गर्दीने गजबजून जाईल आणि स्थानिक व्यावसायिकांना दिलासा मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here