महायुतीचे उमेदवार महेश बालदी शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप
उरण दि १७(विठ्ठल ममताबादे ) : उरण विधानसभा मतदार संघात एकूण १४ उमेदवार उभे असून उरण विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत दिसून येते. महायुती(भाजप +शिवसेना शिंदे गट + राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट + आरपीआय पक्ष ) चे उमेदवार महेश बालदी तर महाविकास आघाडी (शिवसेना उबाठा गट + राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट +काँग्रेस )चे उमेदवार मनोहरशेठ भोईर तर शेतकरी कामगार पक्षातर्फे प्रितम म्हात्रे निवडणूक लढवीत आहेत. या तीन उमेदवारांमध्येच खरी लढत आहे. सर्वच पक्षांनी आपापला जोरदार प्रचार सुरु केला आहे.
एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. एकमेकांवर चिखलफेक सुरूच आहे.पक्ष नेतृत्वावर नाराज होऊन अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षात मोठया प्रमाणात पक्ष प्रवेश केल्याचे दिसून येते. उमेदवारांच्या कार्यप्रणालीमुळे अनेकांनी दुसऱ्या पक्षात पक्ष प्रवेश केला आहे. तर काही उमेदवारांच्या कार्यप्रणालीवर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जनताही मोठया प्रमाणात नाराज आहेत. प्रचाराला कुठे थंड तर कुठे चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वच उमेदवार निवडून येण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. मात्र नाराज पदाधिकारी कार्यकर्त्यांचा फटका उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उरण विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार महेश बालदी यांनी आपल्या प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे, मावळ लोकसभा मतदार संघांचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचा फोटो नसल्याने शिवसेनेच्या (शिंदे गटाच्या )पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये मोठया प्रमाणात नाराजी पसरली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उरण विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार महेश बालदी यांना शिवसेनेच्या नाराजी मुळे ८ ते १० हजार मतांचा फटका बसणार आहे. शिवसेनेचे (शिंदे गटाचे )उरण विधानसभा मतदार संघात १० हजार हुन जास्त मते आहेत.या मताकडे दुर्लक्षुन चालणार नाही. महायुतीचे उमेदवार महेश बालदी यांच्या मनमानी व एकतर्फी कारभाराचा फटका महेश बालदी यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीत १००% बसणार असल्याचे मत शिवसेनेचे नेते अतुल भगत यांनी व्यक्त केले.