पुणे : उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा काही भाग आणि उत्तर अरबी समुद्राच्या बहुतांश भागातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासास शनिवारी (ता. ५) सुरुवात झाली आहे. रविवारी (ता.६) कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
पुणे व आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस; तर कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर येथे तुरळक ठिकाणी पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या जिल्ह्यांना मंगळवारपर्यंत (ता. ८) ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसभर उन्हाचा चटका सहन करणाऱ्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळणार आहे.