महाराष्ट्रात येऊन मोदींनी माफी का मागितली? राहुल गांधी

0

सांगली : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधानांनी शिवरायांची आणि शिवप्रेमींची माफी मागितली होती. परंतु या माफीमागे तीन कारणं असू शकतात, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींना टार्गेट केलं.
सांगली येथे आयोजित पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले की, पतंगराव कदम यांनी ६० वर्षांमध्ये कधीच कुणाची माफी मागितली नाही. कारण त्यांनी कधीच चुकीचं काम केलं नाही. जो चुकीचं काम करतो तोच माफी मागतो. काही दिवसांपूर्वी येथे शिवरायांचा पुतळा कोसळला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली.
राहुल म्हणाले की, पंतप्रधानांनी माफी मागितली त्याची तीन कारण असू शकतात. एक शिवरायांचा पुतळा बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट आरएसएसच्या व्यक्तीला दिलं, असं नव्हतं करायला पाहिजे.. मेरिटवर काम द्यायला पाहिजे होते.. असं त्यांना वाटलं असेल. त्यामुळे पंतप्रधानांनी माफी मागितली असणार.
दुसरं कारण सांगताना राहुल गांधी म्हणाले, पुतळा बनवण्याच्या कामात भ्रष्टाचार झाला, त्यामुळे माफी मागितली असेल. ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याने भ्रष्टाचार केला, चोरी केली.. म्हणून पंतप्रधानांनी माफी मागितली असेल.
तिसरं कारण, शिवरायांचा पुतळा बनवला परंतु तो बनवताना तो उभा राहिला पाहिजे, याकडे लक्ष दिलं नाही. मी गॅरंटी देतो की, पतंगराव कदम यांचा पुतळा पुढची ५०-६० वर्षे असाच असेल.
सगळ्यात मोठे महापुरुष शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर काहीच दिवसांमध्ये तो कोसळत असेल तर तो शिवरायांचा अवमान आहे. मोदींनी केवळ शिवरायांची माफी नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची माफी मागितली पाहिजे. अशा शब्दात राहुल गांधींनी मोदींचा समाचार घेतला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here