पुणे दि. 4 : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘महारेल’तर्फे महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या 440 कोटी रुपयांच्या 9 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि नियोजित 700 कोटी रुपयांच्या 11 उड्डाणपूल तसेच भुयारी मार्गांचे भूमिपूजन करण्यात आले. महाराष्ट्र फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून गतीने ही कामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गडकरी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल कांबळे, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्य आणि केंद्र एकत्र आल्याने चांगली कामे उभी रहात आहेत. रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या ठिकाणी फाटक नसले की नागरिकांच्या जीवाला धोका असतो. म्हणून असे प्रकल्प लवकर पूर्ण करून जनतेचा त्रास दूर करण्याचे प्रयत्न आहे. राज्यात रेल्वेसंबंधी प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावेत म्हणून राज्य शासनाने महारेलची स्थापना केली. महारेलतर्फे वेगाने कामे करण्यात येत आहेत. राज्यात 9 उड्डाणपूलांचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूलांचे भूमिपूजन प्रथमच होत आहे. उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामांमुळे जनतेचा वेळ वाचणार आहे.