विरार : महाराष्ट्रातील दुसरे तर पालघर जिल्ह्यातील पहिले व एकमेव असे जमिनीखाली असलेले गणपतीचे आगळे-वेगळे मंदिर सध्या पहायला वसईत गर्दी होत आहे.
नालासोपारा पश्चिम वाघोली येथील जयवंत नाईक व किशोर नाईक बंधू यांच्या फुलारे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित हे श्री गणेश ध्यान मंदिर असून येणा-या भाविकांना या मंदिराच्या गाभाऱ्यात ध्यानधारणा तसेच गणेशाची उपासना, आवर्तन करता येणार आहे.
एकवीस वर्षांपूर्वी नाईक बंधूंनी आपल्या वडिलोपार्जित शेतीवाडीत या गणेश मंदिराची उभारणी केली आहे. मुंबईपासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर कोकणात किंवा गोव्याला गेल्याचा फील देणारा वसई-विरार पट्टा आहे. वाघोलीचा परिसर हा हिरवाई , निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. अर्नाळा, कळंब ,राजोडी समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक सध्या येत असून या पर्यटकांची पावले आता वाघोली गावाकडे वळू लागली आहेत.
तीन दिवसांपूर्वी प्लॅन आखला अन्..
फुलारे चॅरिटेबल ट्रस्ट हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबवित असतो. या ट्रस्टचे श्री गणेश मंदिरासोबत वाघोली गावात सुमारे बारा एकराच्या विस्तीर्ण जागेत शनी मंदिर आहे. आकाशाच्या निळ्या छत्राखाली एका उघड्या रिंगणाच्या मधोमध शिंगणापूरसारखी स्वयंभू शनीच्या शिळेची प्रतिकृती आहे. भाविक तिथे स्वहस्ते तेलाचा अभिषेक करू शकतात. तेलविक्री बचत गटाच्या महिलांमार्फत केलेली आहे. अभिषेकासाठी वापरले गेलेले हे तेल वाया न घालवता व्यवस्थित रिसायकल करून त्यात औषधी वनस्पतींचे अर्क मिसळून वृद्धांना व रुग्णांना मालिशसाठी विनामुल्य प्रसाद रूपाने वाटले जाते.
शनिदेवाची प्रतिमा असलेले मंदिर प्रशस्त आणि आकर्षक आहे. लाकडापासूनचे उत्तम कौलारू काम यांची फार सुरेख रचना बांधकामासाठी केलेली आहे. आयुष्यभर कष्ट करून थकलेल्या वृद्धांच्या दुखर्या पायांना घडीभर आराम देणारी, पाय दाबून देणारी यंत्रे विनामूल्य उपलब्ध केलेली आहेत. बिना दरवाजाचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनी शिंगणापूरला जाणे जमत नसल्याने वसईकरांना फुलारे-नाईक परिवाराच्या शनि मंदिर सोयीचे ठिकाण ठरले आहे.
शनिमंदिरातून भाविकांना दिलेली प्रसादरूपी फुल-झाड म्हणजे पर्यावरणाचे महत्व जाणून झाडे लावा व झाडे जगवा यासाठी राबवलेला सामाजिक उपक्रमच म्हणावा लागेल. शनिमंदिराचे जयवंत फुलारे- नाईक यांनी यासाठी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ५ लाखांहूनही अधिक फुले व फळझाडांचे मोफत वाटप करत निर्सगाचा समतोल राखण्यासाठी हातभार लावला आहे.
शनिमंदिर व फुलारे ट्रस्टद्वारे आरोग्य व रक्तदान शिबीरे, विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप, खाद्य-नाट्यसंगीत महोत्सव, एकांकीका स्पर्धा, क्रीडा स्पर्धा अशा विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक विषय वर्षभर राबवत असतात. मंदिर परिसरात सामवेदी खाद्य पदार्थांचा आस्वाद भाविकांना घेता येतो. या परिसरात श्री संत सद्गुरू बाळु मामा व श्री विठ्ठल रखुमाई माताचे मंदिर उभारण्यात आले आहे. दर अमावस्येला बाळु मामांच्या नावाने भंडारा असतो.