महेश बालदी यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध 

0

भाजपने विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेनेत नाराजी.

उरण दि २८(विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्रातील निवडणुकी संदर्भात सर्वच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी जोरात सुरु आहे. सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले असून उरण विधानसभा मतदार संघातही विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते वरिष्ठाच्या आदेशाने कामाला लागले आहेत. उरण विधानसभा मतदार संघात आगामी होणाऱ्या निवडणुका संदर्भात शिवसेना (शिंदे गट )पक्षाची भूमिका काय आहे. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भूमिका काय आहे. पदाधिकारी कार्यकर्ते यांची भूमिका काय आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम करावे आदी विषया संदर्भात शिवसेना शिंदे गटा तर्फे रविवार दिनांक २७/१०/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता रत्नेश्वरी मंदिर सभागृह, जसखार, तालुका उरण येथे पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाची भूमिका जाहिर करताना शिवसेना जिल्हा प्रमुख अतुलशेठ भगत यांनी भाजपने उमेदवारी जाहीर करताना शिवसेनेला विश्वासात न घेतल्याने शिवसैनिक नाराज असून महेश बालदी यांच्या उमेदवारीला जाहीर विरोध आहे असे सांगितले व निवडणुकीत महेश बालदी यांचे काम करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या मेळाव्या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट)चे खालापूर विभाग प्रमुख निवेदिता कोंडीलकर,उरण तालुका प्रमुख प्रणाली म्हात्रे,पनवेल तालुका प्रमुख प्रगती ठाकूर, उरण उप तालुका प्रमुख तृप्ती पाटील, उलवे शहर संपर्क प्रमुख सीमा धस, विभाग प्रमुख गणेश घरत,चाणजे विभाग प्रमुख अक्षय म्हात्रे,माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, माजी उपसरपंच नितीन पाटील, उलवे उप शहर प्रमुख सतिशीला कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी प्रस्तावनेत उरण तालुका संपर्क प्रमुख दिपक ठाकूर यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी राबविलेल्या लोक कल्याण कारी योजणांची, मंत्री मंडळातील विविध निर्णय यांची उपस्थितांना माहिती दिली.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहेत त्यामुळे प्रत्येक घटकाला त्यांनी न्याय दिला. आपण सर्वांनी एकत्र येत शिवसेना पक्ष मजबूत करून एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाऊया. पक्षाचे आदेश शिर सावंदय समजून काम करूया.रायगड जिल्ह्यात महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, भरत गोगावले यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी काम करूया असे आवाहन केले.

 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख अतुलशेठ भगत यांनी पदाधिकारी मेळावा घेण्यापाठीमागचे कारण स्पष्ट केले. त्यावेळी भाषण करताना अतुल भगत म्हणाले की  ” उरण विधानसभा मतदारसंघात भाजपने शिवसेनेला (शिंदे गटाला) विश्वासात न घेता उमेदवारी दिली.वास्तविक पाहता उरण विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीरंग बारणे यांना २०१९  च्या विधानसभा पेक्षा ३०, ००० मते जास्त पडले आहेत.उरण विधानसभा मतदारसंघात ४०, ००० हुन अधिक  महिलांनी लाडकी बहन योजनेचा लाभ घेतला आहे. अन्य महिलांनी विविध योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला आहे. उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची चांगली पकड आहे. तळागाळात शिवसेनेचा प्रचार व प्रसार चांगल्या पद्धतीने झाला आहे.उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला तिकीट दिल्यास उमेदार १०० % निवडून येईल शिवसेनेला येथे पोषक वातावरण आहे मात्र एकनाथ शिंदे यांना विश्वासात न घेता भाजपने अगोदरच आपली यादी जाहीर करून उरण विधानसभा मतदार संघातून भाजपचे महेश बालदी यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या निर्णयामुळे नाराज आहेत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की उरण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडावे. मात्र उरण विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडल्याने पदाधिकारी कार्यकर्तेही नाराज झाले आहेत.एकवेळ भाजप पक्षाचे उमेदवार महेश बालदी नको. दुसरा कोणताही स्थानिक भूमीपुत्राला भाजप मधून उरण विधानसभासाठी तिकीट द्यावे. स्थानिक भूमीपुत्र असलेल्या व्यक्तीलाच भाजप मधून उमेदवारी दया अशी भूमिका यावेळी वरिष्ठांच्या आदेशाने  शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्या प्रमाणे शिवसेनेचा महेश बालदी यांना विरोध असल्यामुळे शिवसेना उरण विधानसभा मतदार संघात महेश बालदी यांचे काम करणार नाही ”  असे अतुलशेठ भगत यांनी सांगितले. अतुलशेठ भगत यांनी सविस्तर पणे पक्षाची भूमिका पदाधिकारी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली. या कार्यक्रम दरम्यान उरण मधील तरुणांनी व उलवे मधील महिला वर्गांनी शिवसेना शिंदे गटात मोठया प्रमाणात पक्ष प्रवेश केला. शिवसेनेने आपला पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा घेउन आपली भूमिका जाहिर केल्याने महायुतीचे भाजपचे उमेदवार महेश बालदी यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here