देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी –
तनपुरे साखर कारखान्यात मागील सहा वर्षात कोट्यावधींचा गैरव्यवहार झाला. त्याच्या चौकशीच्या मागणीसाठी राहुरी तहसिल कार्यालया समोर कारखाना बचाव कृती समितीतर्फे चक्री उपोषण सुरू केले आहे.आमचा बोलविता धणी कोणीच नाही.तालुक्यातील सर्व शेतकरी व वंचित घटक हाच आमचा धणी आहे.सत्ताधारी संचालक मंडळाने काल तहसिलदारांना निवेदन देताना जे आरोप केले. ते म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असाच प्रकार आहे.आमची काय चौकशी करायची ती करा पण तुमच्या सहा वर्षाच्या कारभाराची प्रथम चौकशी झाली पाहिजे.आमच्या आंदोलनाचा धसका घेऊन, सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे, आमच्या चौकशीच्या मागणीची नौटंकी सुरू आहे.” असे कृती समितीचे संयोजक अमृत धुमाळ यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलतांना धुमाळ म्हणाले, “मागील सहा वर्षे कारखान्यात भंगार विक्री, साखर विक्री, इथेनॉल विक्री, कारखाना मालकीची जमीन विक्री, कारखाना मालकीच्या जमिनीतील गौण खनिज उत्खनन व विक्री, कारखाना संलग्न संस्थेतील शिक्षक भरती, डोनेशन अशा विविध प्रकरणात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता नसतांना, साखर आयुक्तांची मान्यता नसतांना प्रभारी कार्यकारी संचालकपदी बी. एन. सरोदे यांची नेमणूक करण्यात आली.”
“खासदार डॉ. सुजय विखे यांच्या ताब्यात सहा वर्षे कारखान्याची सूत्रे होती. त्यावेळी आमच्या चौकशीसाठी त्यांचे सहा वर्षे कुणी हात धरले होते काय? त्यांच्या गैरव्यवहारांच्या चौकशीची आम्ही मागणी केल्यावर यांना कंठ कसे फुटले? ते सभासदांच्या लक्षात आले आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे कारखान्याच्या थकबाकीपोटी दोन लाख ३२ हजार ५४० रुपये भरले आहेत.”
“कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यावर राजीनामे दिले नाहीत. त्यामुळे, सन २०२२-२३ गळीत हंगाम सुरू करण्याचा नैतिक अधिकार सत्ताधाऱ्यांना होता. आमचा काहीही संबंध नव्हता. परंतु, यंदाच्या वर्षी कारखाना बंद ठेवून सभासद, कामगारांना वाऱ्यावर सोडण्याचे पाप सत्ताधाऱ्यांनी केले. विरोधकांनी कारखाना चालू करावा. असा कांगावा करून, कारखाना बंद ठेवण्याचा स्वतःचा नाकर्तेपणा दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रकार केला आहे.”
“चौकशीला आम्ही घाबरत नाही. दोषी आढळल्यास शिक्षा भोगण्यास तयार आहे. खुशाल आमची चौकशी करा. परंतु, तुमच्या गैरव्यवहाराची सुद्धा चौकशी झाली पाहिजे.”कोणाच्या कार्यकाळातील चौकशी करायची ती कराच तुमचे कोणीही हाथ धरले नाही,धरणार पण नाही.तुमच्या कारभाराची चौकशी करायची म्हटल्यावर तुम्हाला मागच्या कारभाराच्या चौकशीचे ध्यान आले का?होवू द्या चौकशी दुध का दुध पाणी का पाणी सर्व सभासदांसमोर येईल सभासदांना सुद्धा समजुद्या तालुक्यातल्यानी की बाहेरच्यांनी फसवले असे आवाहन धुमाळ यांनी केले.
तहसिल कार्यालया समोर सुरु असलेल्या उपोषणात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुण पा.कडू,पंढरीनाथ पवार राजुभाऊ शेटे,दिलीप इंगळे,संजय पोटे,रविंद्र मोरे,धनराज गाडे,सुरेश लांबे,विलासराव कोबरणे,कोंडीराम विटनोर,बाळासाहेब जठार दत्ताञय जाधव, नारायण टेकाळे,अँड भाऊसाहेब पवार आदी सहभागी झाले होते.