संगमनेर : माझ्या मालकीच्या रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यास मी परवानगी दिली. त्याचे वाईट वाटून सिताराम पुंजा राऊत याने घुलेवाडी तलाठी कार्यालय येथे आमचा रस्ता अडवून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच सिताराम पुंजा राऊत, संजय पुंजा राऊत, संतोष लहानू राऊत आणि त्यांचे सोबत असणाऱ्या दहा ते पंधरा अनोळखी लोकांनी माझ्या घरावर हल्ला करून घराचे नुकसान केले. या बाबतची फिर्याद कविता संतोष अभंग यांनी शहर पोलिसात दिल्यावर पोलिसांनी माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांच्यासह त्यांचे बंधू आणि इतर दहा ते पंधरा लोकांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कविता संतोष अभंग (रा. घुलेवाडी) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की माझी मुले विद्या संतोष अभंग, समृद्धी संतोष अभंग व प्रथमेश संतोष अभंग यांच्यासह मी घुलेवाडी येथे राहते. १ फेब्रुवारी २०१७ रोजी माझे पती मयत झालेले आहेत. ते हयात असताना त्यांच्यासोबत २०११ साली ०.०९ आर क्षेत्राचा डेव्हलपमेंटचा करार सिताराम पुंजा राऊत व सुनील बन्सी राठी यांनी फसवून केला होता. ते कराराप्रमाणे न वागता माझे पतीस त्रास देऊन करारात ठरल्याप्रमाणे रक्कम दिली नाही व धमक्या दिल्या. त्यामध्ये माझे पती दबावामुळे मयत झाले. त्यानंतरही सिताराम राऊत यांनी मला व माझे कुटुंबीयांना त्रास देण्याचे काम चालूच ठेवले. त्याने माझ्या खाजगी मालकीच्या रस्त्यावरही हक्क सांगण्यास सुरुवात करून रस्ता तुझ्या बापाचा नाही अशा धमक्या दिल्या. १३/९/२०२२ रोजी दुपारी चार वाजता मला काही भाजीपाला विकणाऱ्या महिलांनी आम्ही तुमच्या रस्त्यावर भाजीपाला विकू का असे विचारले. तेव्हा मी त्यांना संमती दिली. सदर बाब सिताराम राऊत यास माहित पडली व तो लागलीच त्याच्या कार क्रमांक एम.एच १७ बी.एक्स ०६४३ ही चार चाकी गाडी तेथे घेऊन आला व आमच्यात वाद झाला. त्याबाबत मी शहर पोलीस स्टेशनला जात तक्रार नोंदवली. त्यानंतर दि.१९/९/२०२२ रोजी दुपारी १२ वाजता मी तसेच माझा भाऊ भारत संभाजी भोसले मुलगी विद्या अभंग असे माझ्या भावाचे गाडीतून तलाठी कार्यालयात उतारा काढण्यासाठी जात असताना सिताराम राऊत यांनी आमच्या गाडीला त्याची गाडी आडवी लावून आमचा रस्ता अडवून आम्हा सर्वांना खाली उतरून त्यास माझी जात माहित असताना मला जातीवाचक शिवीगाळ करून जातीचा अपमान केला. तेव्हा आमचे तेथे भांडण झाले. त्यानंतर मी व मुलगी असे घरी आलो भाऊ भारत हा निघून गेला. त्यानंतर वरील घटनेचा राग मनात धरून सिताराम पुंजा राऊत त्यांचा भाऊ संजय पुंजा राऊत, संतोष लहानू राऊत यांच्यासह दहा ते पंधरा लोक १ वाजेच्या सुमारास माझ्या घरी आले व शिवीगाळ करून घराच्या समोरील कुंड्या फेकून खिडकीच्या काचा फोडल्या तसेच पाण्याची टाकी व स्कुटी गाडी लोटुन नुकसान केले. त्यामुळे मी व माझी मुलगी मागील दाराने पळून गेलो. याबाबत कविता संतोष अभंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील सर्व लोकांवर संगमनेर शहर पोलिसांनी ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
चौकट :-
घुलेवाडी येथील कविता संतोष अभंग आणि घुलेवाडी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा घुलेवाडीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सिताराम राऊत यांच्यात रस्त्यावरून वाद आहेत. या वादातूनच सिताराम राऊत यांना दोन महिला सह अन्य दोघांनी गत महिन्यात घुलेवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मारहाण केली होती. याबाबत सिताराम राऊत यांनी शहर पोलीस ठाण्यात जात कविता संतोष अभंग, विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग आणि भारत संभाजी भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी सिताराम राऊत यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ घुलेवाडीच्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गाव बंद केले होते. आता सिताराम राऊत यांच्यासह त्यांचा भाऊ आणि इतर दहा ते पंधरा लोकांवर शहर पोलिसात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.