घरांचे पत्रे व छप्पर उडाल्याने नुकसान
<p>देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील मानोरी परिसरात गणपतवाडी शिवारात वादळी वार्यासह जोरदार पावसामुळे घराचे पत्रे, छप्पर, विजेचे खांब तसेच झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.
<p> मानोरी परिसरात शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वार्यासह जोरदार पावसाचे आगमन झाले. गणपतीवाडी परिसरातील पाटीलबा बाचकर व देवका पिलगर यांच्या राहत्या घराचे छप्पर या वादळी वार्याने उडून गेले. पावसाबरोबर वादळी वार्यामुळे येथील जनाबाई विटनोर यांचे घराचे वीस पत्रे उडाली, शंकर पिसाळ जनावरांचे छप्पर तसेच शकील पठाण घरावरील पत्रे उडून गेल्याने या शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
<p> या वादळी वार्यामुळे अनेकांचा संसार उध्वस्त झाले आहे. तसेच काही ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडल्याने या भागातील विजपुरवठा खंडीत झाला आहे. या वादळात अनेक झाले पडली असून घराच्या भिंतीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. शासनाने नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करावे तसेच शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गांतून केली जात आहे