पुणे : एक सप्टेंबर ते 3 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. सप्टेंबरच्या या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी एक जून ते 30 ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात जेवढा पाऊस होतो त्यापेक्षा अधिक पाऊस यंदा जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचा कालावधीत झाला आहे.
या तीन महिन्यांच्या कालावधीत यंदा सरासरीच्या तुलनेत 128 टक्के पाऊस झाला आहे. म्हणजेच 28% जास्तीचा पाऊस पहिल्या तीन महिन्यांमध्येचं झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे मान्सूनचा आणखी एका महिन्याचा काळ बाकी आहे. असे असताना भारतीय हवामान खात्याने मान्सून संदर्भात एक नवीन माहिती दिली आहे.
खरंतर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये खरीप हंगामातील पिकांची स्थिती चांगली आहे. राज्यातील कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात खरीपातील धान, सोयाबीन, कापूस, मका, तूर, मूग, उडीद अशा सर्वच पिकांची स्थिती सध्या चांगली आहे.
सोयाबीन आणि कापसाचे पीकही जोमदार आहे. पण, सप्टेंबरच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख सोयाबीन आणि कापूस उत्पादक पट्ट्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस आणि सोयाबीनचे पीक अडचणीत आले आहे.
त्यामुळे पिकांची वाढ खुंटण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यात ही सरासरीच्या 109% पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे सप्टेंबर च्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा तयार होईल आणि यामुळे परतीच्या पावसाचा मुक्काम लांबण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक ‘ला-निना’ लवकरच सक्रिय होण्याची शक्यता आहे. हा घटक सप्टेंबरमध्ये विकसित होईल असा अंदाज आहे. या ला निनाच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जास्त पाऊस होण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी ज्या ज्या वेळी मॉन्सूनच्या उत्तरार्धात ‘ला-निना’ स्थिती अवतरली तेव्हा परतीचा पाऊस सुद्धा लांबला आहे.
यामुळे यंदाही मान्सूनचा परतीचा पाऊस लांबेल असे वाटत आहे. यंदा परतीचा पाऊस लांबणार अशी शक्यता पाहता ऑक्टोबर महिन्यातही जोरदार पाऊस होईल असे काही हवामान तज्ञांचे म्हणणे आहे.कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जर सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आणि परतीचा पाऊस लांबला तर याचा खरीप हंगामातील पिकांवर मोठा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.