माहाराष्ट्रात रावसाहेब दानवे यांच्यासह ‘या’ मातब्बर नेत्यांना पराभवाचा धक्का

0

मुंबई :लोकसभा निवडणुकांचे निकाल आज (4जून) लागले आहेत. देशात बहुमताचा आकडा कोणत्याही एका पक्षाला गाठता आला नाही. राज्यामध्ये सर्व निवडणूक पूर्व चाचण्यांना exit pol चकवा देत अनेक दिगज्जांना पराभवाचा धक्का दिला . तर अनेकांना विजयाची लॉटरी लागली आहे. यामध्ये केंद्रात मंत्री राहिलेले रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार यांच्यासह कपिल पाटील यांच्यासारख्यां मातब्बर नेत्यांना पराभवाचा धक्का

रावसाहेब दानवे – जालना

पाचवेळा खासदार असलेले आणि केंद्रात रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम केलेल्या रावसाहेब दानवेंना सगळ्यात मोठा राजकीय पराभव स्वीकारावा लागला.

2019ला तब्बल 3 लाख 30 हजार मतांनी निवडून आलेले रावसाहेब दानवे सुमारे 60 हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाचा प्रभाव जालन्याच्या निवडणुकीवर दिसून आला . जरांगे पाटलांच्या आंदोलनात खांद्याला खांदा लावून सहभागी झालेले जालना लोकसभेचे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी या निवडणुकीत 1लाखापेक्षा जास्त मतं घेतली आहेत,

डॉ. भारती पवार – दिंडोरी

मतमोजणीच्या आदल्या दिवशी माध्यमांसोबत बोलताना भारती पवार यांनी एक लाखांच्या फरकाने माझा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला होता पण दिंडोरीच्या मतदारांनी तेवढ्याच मतांनी भारती पवार यांचा पराभव केला आहे. भाजपच्या डॉ. भारती पवार यांच्याविरोधात शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांनी सुमारे 1 लाख मतांनी विजय मिळवला आहे. या मतदारसंघासाठी कांद्याचा मुद्दा महत्त्वाचा होता. तोच मुद्दा या मतदारसंघात गाजल्याचा पाहायला मिळालं.

उज्ज्वल निकम – उत्तर-मध्य मुंबई

भाजपने उत्तर-मध्य मुंबई लोकसभेसाठी सरकारी वकील म्हणून चर्चेत राहिलेल्या उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलेल्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली गेली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. मतमोजणीमध्ये कधी उज्ज्वल निकम आघाडीवर होते तर कधी वर्षा गायकवाड आघाडीवर होत्या. पण अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये मुंबईच्या इतर मतदारसंघांप्रमाणेच उत्तर-मध्यच्या मतदारांनीही महाविकास आघाडीलाच कौल दिल्याचं दिसून आलं.

कपिल पाटील – भिवंडी

2021मध्ये केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री झालेल्या कपिल पाटील यांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून कपिल पाटील यांची निवड करण्यात आली होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना उमेदवारी दिली आणि ही निवडणूक रंगतदार बनली.अखेर बाळ्यामामांनी कपिल पाटील यांचा सुमारे 80 हजार मतांनी पराभव केला आहे.

सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर

2019च्या निवडणुकीत काँग्रेसने फक्त एक जागा जिंकली होती. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री राहिलेल्या हंसराज अहिर यांचा 44 हजार 763 मतांनी पराभव केला होता. 30 मे 2023ला बाळू धानोरकर यांचं निधन झालं आणि 2024मध्ये त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी घोषित केली. भाजपने या ठिकाणी राज्यात वनमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली. खरंतर उमेदवारी मिळाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांची स्वतःची इच्छा नसतानाही त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्याचं सांगितलं होतं. काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा 2 लाख 50 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.

हीना गावित – भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या

महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आणि दोनवेळा नंदुरबारच्या खासदार राहिलेल्या हीना गावित यांनाही या निवडणुकीत पराभवाचा झटका बसला आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनी नंदुरबारमध्ये हीना गावीतच विजयी होतील असा अंदाज वर्तवला होता पण अक्कलकुव्याचे आमदार आणि माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली.हीना गावित यांना गोवाल पाडवी यांच्याकडून 1 लाख 59 हजार120 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे.

नवनीत राणा – अमरावती

महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख राहिलेल्या उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीसमोर आंदोलन करून अचानक चर्चेत आलेलं राजकारणी जोडपं म्हणजे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा.2019च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपने त्यांना अमरावती लोकसभेची उमेदवारी घोषित केली.भाजपकडून नवनीत राणा आणि महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे असा सामना होणार असं दिसत होतं पण महायुतीचे घटक असलेल्या बच्चू कडू यांनी बंड केलं आणि शिवसेनेतून दिनेश बुब यांना आयात करून प्रहार पक्षातर्फे उमेदवारी घोषित केली.या लढतीत नवनीत राणांचा पराभव झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here