मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का देत महाविकास आघाडीने राज्यात तब्बल 30 जागांवर मुसंडी मारली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार मानले.
शरद पवार म्हणाले, निकाल लागल्यानंतर मी काही नेत्यांशी चर्चा केली आहे. उद्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्यासाठी आम्ही दिल्लीमध्ये जाणार आहोत. मी चंद्राबाबूंशी बोललो त्यात तथ्य नाही. मी केवळ काँग्रेस नेत्यांशी बोललो, असे म्हणत शरद पवार यांनी इंडिया आघाडीची पुढील रणनिती स्पष्ट केली. आम्ही 10 पैकी 7 जागांवर पुढे आहेत. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.
पुढे शरद पवार म्हणाले, आम्ही 10 पैकी 7 जागा जिंकणार आहोत. महाविकास आघाडीला चांगला यश मिळालं. आम्ही या निवडणुकीत जीवाभावाने काम करण्याची भूमीका घेतली होती त्यामुळे हे निकाल आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील आम्ही एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे देखील शरद पवार म्हणाले.
या निवडणुकीत देशाचे चित्र बदलले आहे आणि त्यात महाराष्ट्राची प्रमुख भूमिका आहे. याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचा मला अभिमान आहे. देश हिताच्या दृष्टीने इंडिया आघाडी काही पावले टाकत असतील तर महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सामूहिक योगदान देण्यात अग्रभागी राहू.
मोदी सरकारला धक्का, स्मृती इराणीसह 9 मंत्री मागे, यूपी-राजस्थानमध्ये गणित बिघडलं
तर अजित पवार (Ajit Pawar) यांना पुन्हा पक्षात घेणार का? यावर बोलताना शरद पवार म्हणाले सध्या त्यांना पक्षात घ्याचा की नाही हा विषय नाही यामुळे त्याच्यावर काही चर्चा करून उपयोग नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना दिली.