बीड : “शिवाजी महाराज असो की भगवान बाबा यांना कुणालाच संघर्ष चुकला नाही. मुंडे साहेबांना देखील संघर्ष चुकला नाही. ज्या पक्षात कुणीही जात नव्हतं त्या पक्षाचं कमळ घेऊन त्यांनी पक्ष वाढवला. 40 वर्षांच्या आयुष्यात केवळ त्यांना साडेचार वर्षांचीच सत्ता मिळाली.” “संघर्ष कुणालाही चुकला नाही. जे जोडे उचलतात ते कधीही इतिहास लिहित नाहीत,” त्यामुळे “मी झुकणार नाही, मी थकणार नाही, मी रुकणार नाही,” असे म्हणत पंकजा मुंडे यांनी भगवानगडाच्या पायथ्याशी घेतलेल्या दसरा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधताना म्हटले .त्यांचा या भाषणातून त्यांनी संघर्षाचा नाराच दिला असल्याचा राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.
पंकजा पुढे म्हणाल्या की “माझ्यावर काही जण आरोप करतात की मी गर्दी करते. मी जिथे जाते तिथे गर्दी होते. माझ्या राष्ट्रीय नेत्यांनी मला सांगितलं की हीच गर्दी तुमची ताकद आहे. ही गर्दी माझ्यासाठी चांगली आहे आणि पक्षासाठी देखील चांगली आहे.”
“दोन वेळा माझ्या सभेला अमितभाई शाह आले होते. त्यांनी आपली गर्दी पाहिली, रानावनातून लोक जमा झालेले त्यांनी पाहिले. त्यामुळे मी गर्दी जमवते हा आरोप मला मान्य नाही,” असे पंकजा यांनी म्हटले.
पंकजा मुंडे म्हणाल्या की मी २०२४ ची तयारी सुरू करत आहे. पक्षाने तिकीट दिलं तर मी परळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात ही चर्चा रंगली आहे की २०२४ च्या निवडणुकीबाबत पंकजा यांनी आताच घोषणा करण्याचे प्रयोजन काय?
पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात घोषणा केली की, मी आता २०२४ च्या तयारीला लागणार आहे. पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात अनेक गोष्टींवर भाष्य केले.
“जर पक्षाने मला तिकीट दिलं तर मी परळी मतदारसंघातून २०२४ला निवडणूक लढवणार आहे आणि त्याची तयारी आतापासूनच सुरू करणार आहे,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
“आपल्या नेत्याकडे पद असावे अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते त्यात गैर काय आहे,” असा सवाल त्यांनी यावेळी केला.
घराणेशाहीवर त्या बोलल्या. “मी काही कुणाचा वारसा चालवत नाही. मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही. गोपीनाथ मुंडेंनी ज्या दीनदयाल उपाध्याय यांच्या विचार आणि ज्या पक्षाचा ध्वज हाती घेतला तो वारसा मी चालवत आहे,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
“मी अटल बिहारी वाजपेयी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि नरेंद्र मोदी यांचा वारसा चालवत आहे. त्यांच्याकडे पाहूनच गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन राजकारणात आले. त्यांचाच वारसा मी चालवत आहे,” असे पंकजा यांनी म्हटले.
नरेंद्र मोदी यांच्याबाबतच्या वक्तव्याबाबतचे स्पष्टीकरण
पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की जर मी जनतेच्या मनात असेल तर माझं राजकारण मोदी देखील संपवू शकणार नाहीत. त्यावर पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण दिले.
त्या म्हणाल्या काही लोकांनी माझी क्लिप एडिट करून पसरवली आणि मी मोदींबद्दल बोलले असं चित्र निर्माण केलं, मी कधी माझ्या शत्रूवर सुद्धा टीका करत नाही तेव्हा ज्यांच्या विचारांवर चालते त्यांच्याविरोधात मी कसं बोलेन असं त्या म्हणाल्या.
मी कुणावरही नाराज नाही पण..
“दरवेळी असं म्हटलं जातं की मी नेतृत्वावर नाराज आहे. अमक्यावर नाराज आहे. मी कुणावरही नाराज नाही. पण जर तुम्ही दसरा मेळाव्याला आला नाहीत तर मात्र मी नाराज होईन. तेव्हा कृपया मीडियावाल्यांना माझी ही विनंती आहे की मी नाराज असल्याच्या बातम्या देऊ नका. मी गेल्या 17 वर्षांपासून राजकारणात आहे. मी काही काल आले नाही.
“मी कुणावर नाराज असायला हे काही घरगुती भांडण नाही,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
मी पदर पसरणार नाही
“मी कुणाकडे पदर पसरून मागायला जाणार नाही. मला खुर्चीची हाव नाही,” असे पंकजा यांनी म्हटले. भाषणाच्या शेवटीला पंकजा म्हणाल्या मी उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.