कोपरगाव-“ देश सेवेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या उद्देशाने अंमलात आलेली राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे महाविद्यालयातील मूल्यशिक्षणाची कार्यशाळाच आहे. हे लक्षात घेऊन स्वयंसेवकांनी स्वतःच्या विकासाबरोबर समाजाचे हित कशात आहे याचा शोध घ्यावा, व त्यातून सक्षम भारताची निर्मिती घडून आणावी असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे नोडल ऑफिसर प्रा. डॉ. प्रताप फलफले यांनी केले. येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एस. जी. एम. महाविद्यालयात झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वरूप आणि महत्व विशद करताना त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची गरज, नीती मूल्य, शाश्वत विकास याविषयीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सा आर. आर. यांनी आपल्या मनोगतातून, विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात जाऊन ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता, आरोग्य या विषयाचे महत्त्व पटवून द्यावे, ग्रामीण व्यसनाधीनता कमी करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले. तसेच सध्याच्या काळात असलेले स्वयंरोजगाराचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. ए. तहाळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. एम. के. दिघे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. प्रतिभा रांधवणे, डॉ. बी. एम. वाघमोडे, प्रा. डॉ. एस. बी. रणधीर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सीमा चव्हाण व कुमारी अक्षदा भोसले यांनी केले.