मोपलवारांवर कुणाचा ‘साया’? तीन बाया आणि जमवली बक्कळ माया!

0

संदिप शिंदे,मुंबई : एक आयएएस अधिकारी २६ वर्षांच्या सेवा काळात किती कोटी कमावू शकतो ? काही कल्पना करता येते का ? स्वत:च्या नावावर १५०० कोटी, दुसऱ्या बायकोच्या नावावर १५० कोटी, तिसऱ्या बायकोच्या नावावर ३०० कोटी, पहिल्या मुलीच्या नावावर ५०० कोटी, दुसऱ्या मुलीच्या नावावर ३५० कोटी आणि भावाच्या नावावर २०० कोटी रुपयांची संपत्ती… म्हणजे एकत्रित आकडा मिळून ही रक्कम होते तब्बल ३००० कोटी ! या सरकारी अधिकाऱ्याचं नाव आहे राधेश्याम मोपलवार… हा अधिकारी इतक्या साऱ्या संपत्तीचा मालक बनला तरी कसा ? मोपलवारांवर कुणाचा ‘साया’ ? तीन बाया आणि जमवली बक्कळ माया!

समृद्धी महामार्गाच्या बांधणीत महत्वाची भूमिका बजावणारे आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी त्यांच्या २६ वर्षांच्या सेवा काळात ३००० कोटी रुपयांची माया जमवल्याचा खळबळ जनक आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. राधेश्याम मोपलवार यांनी अदानी आणि अंबानी यांनाही मागे टाकलं आहे, असं म्हणत शिवसेनेचे आमदार विकत घ्यायला मोपलवारांच्या पैशांचा वापर केला गेला का, असा खडा सवाल देखील रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी राधेश्याम मोपलवार यांच्या घरातील कोणत्या सदस्याच्या नावावर किती संपत्ती आहे, याची यादी जाहीर केली आहे.

राधेश्याम मोपलवार यांच्या नावावर – १५०० कोटी

दुसऱ्या बायकोच्या नावावर – १५० कोटी

तिसऱ्या बायकोच्या नावावर – ३०० कोटी

पहिल्या मुलीच्या नावावर – ५०० कोटी

दुसऱ्या मुलीच्या नावावर – ३५० कोटी

भाऊ सदानंद मोपलवार यांच्या नावावर – २०० कोटी एकत्रित रक्कम एकूण – ३००० कोटी
राधेश्याम मोपलवार यांनी आयएएस अधिकारी म्हणून २६ वर्षे सेवा बजावली. पण या २६ वर्षांमध्ये कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. मोपलवार यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तसेच कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले. त्यांच्याच देखरेखीखाली समृद्ध महामार्गाची बांधणी झाली आणि त्यांनी स्वतःच्याच समृद्धीत वाढ केली.
राधेश्याम मोपलवार हे आजच्या घडीला देशातील श्रीमंत अधिकारी म्हणून ओळखले जातात. दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील राधेश्याम मोपलवार यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र २०१८ मध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्पुरती कारवाई करून नंतर थेट मोठी जबाबदारी दिली. मोपलवार निवृत्त झाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वॉर रूमचे प्रमुख कसे काय ?, यावरही रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

राधेश्याम मोपलवार यांची भारत आणि भारताबाहेर अशी मिळून एकूण ३ हजार कोटी मालमत्ता आहे. समृद्धी महामार्गाच्या कामाबाबत चार महिन्यात पुन्हा टेंडर काढले आणि त्यात वाढीसाठी मंजुरीही देण्यात आली. त्यानंतर हे टेंडर ५५ हजार कोटींवर गेले. ‌त्यामुळे समृद्धी नेमकी कुणाची झाली ?, सर्वसामान्य माणसांची झाली ?, की अधिकाऱ्यांची झाली ?, हे यातून कळून येतं अशी टीकाही रोहित पवार यांनी केली आहे.
समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्र. ११ च काम गायत्री प्रोजेक्टला देण्यात आले. हे टेंडर १९०० कोटी रुपयांचं होतं. पुढे २०२१ मध्ये हे काम जमणार नाही, असं गायत्री प्रोजेक्टकडून सांगण्यात आलं. त्यानंतर हेच काम हुजूर मल्टीप्रोजेक्टला देण्यात आलं.
आता ही हुजूर मल्टी प्रोजेक्ट कंपनी कोणाची ?, हे ही सविस्तर पाहूयात. या कंपनीत एकूण १ कोटी ५२ लाखाचे समभाग आहेत. यापैकी २३ लाख समभाग दस्तूर खुद्द मोपलवार कुटुंबियाकडे आहेत. राधेश्याम मोपलवार यांची मुलगी तन्वी मोपलवार हिच्याकडे हुजूर मल्टीप्रोजेक्ट कंपनीचे ३ लाख ९८ हजार समभाग आहेत. तर भाऊ सदानंद मोपलवार यांच्याकडे २३ हजार ६४५ समभाग आहेत. शिवाय हुजूर मल्टी प्रोजेक्टचे ४ लाख ९८ हजार समभाग असणारी मेलोरा इन्फ्रा कंपनी ही मोपलवार यांची मुलगी तन्वी मोपलवार यांची आहे. म्हणजेच समृद्धीच्या कामातून मोपलवार यांनी स्वतःच्या कुटुंबासह कंत्राटदारांचंही भलं केलं आहे.

या राधेश्याम मोपलवार यांच्या नावावर घोटाळेच घोटाळे जमा आहेत. मोपलवार यांच्या नावावर जमा झालेले कोणते घोटाळे आहेत ते पाहुयात.
दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशीही जवळीक
भ्रष्टाचाराचे आरोप मात्र, राज्यकर्त्यांच्या जवळीकीमुळे कठोर कारवाई नाही
२०१८ मध्ये सेवानिवृत्त त्यानंतर शासनाकडून मुदतवाढ, समृद्धी महामार्गाच्या कामाची सोपवण्यात आली जबाबदारी
आमदार रोहित पवार यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादग्रस्त सेवानिवृत्त आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार चर्चेत आले. पण या आयएएस अधिकाऱ्यांनी लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणे अपेक्षित असताना त्यांनी स्वतःचंच कल्याण करून घेतलं. प्रभावी राजकीय नेत्यांचा वरदहस्त लाभला की खाओ और खिलाओ असा प्रकार सुरू होतो. आणि जनतेचे नोकर म्हणून पदावर असलेले अधिकारी जनतेलाच लुटून खाण्याचं काम करतात. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांनुसार समृद्धी महामार्गाच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी ३ हजार कोटी रुपये कमावले आहेत. त्यांनी आयएएस म्हणून २६ वर्ष सेवा बजावली मात्र, या २६ वर्षात कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. २६ वर्षांच्या सेवेत ३ हजार कोटी रुपयांची संपत्ती हे कसे शक्य आहे. प्रामाणिकपणे काम करणारा अधिकारी इतकी संपत्ती गोळा करू शकतो का ?, याचे उत्तर नाही असंच आहे. अर्थात या अशा खाऊ अधिकाऱ्यांना राजकीय साथसंगत आणि अभय लाभल्याशिवाय त्यांच्याकडून असे गैरप्रकार घडणे शक्य नाही. हे सांगण्यासाठी कुठल्याही तत्ववेत्याची गरज नाही. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here