राज्यात थंडीच्या कडाक्यात आता उद्यापासून पावसाचाही अंदाज

0

पुणे : सध्या राज्यामध्ये आता बहुतांश भागामध्ये थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. दुपारी ऊन पडत असले तरी हवेत गारठा आहे.
राज्यातील तापमानात चढ-उतार होत असून, गुरुवारपासून काही भागांत पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
राज्यातील हवामान कोरडे आहे.
पण गुरुवारपासून (दि. १४) पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. १५) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

राज्यात दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सर्वात कमी किमान तापमान १४ अंशांखाली नोंदवले गेले होते. तर मंगळवारी पुण्यातच सर्वात कमी १७.१ अंश सेल्सिअस तापमान होते.
कोकणात प्रतीक्षाच
• उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढलेला जाणवत आहे. यात अहिल्यानगर, जळगाव, महाबळेश्वर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, परभणी, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित राज्यात मात्र अद्याप कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे.
• मराठवाड्यात किमान तापमान १७ अंशांवर तर कोकणात १९ अंशांवर नोंदवले जात आहे. विदर्भात १६ ते २० अंशांच्या दरम्यान किमान तापमान आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी अजून तरी पडलेली नाही.

राज्यातील किमान तापमान
पुणे – १७.१
मुंबई – २४.५
अहिल्यानगर – १७.४
जळगाव – १७.७
कोल्हापूर – २०.२
महाबळेश्वर -१५.९
नाशिक – १८.९
बीड – १८.०
नागपूर – १९.०
येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी पुण्यासह काही जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. बंगालच्या दक्षिण-पश्चिम उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आणि त्याच्या पश्चिमेकडे हालचालीमुळे ओलावा निर्माण होत आहे. ओलावा व ढगाळ वातावरण वाढल्यामुळे किमान तापमान / रात्रीचे तापमान थोडेफार वाढण्याची शक्यता आहे. – अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ, पुणे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here