मुंबई : राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून जोरदार बरसला. पण ऑगस्टच्या पहिल्या दोन दिवसात मात्र पावसाचा जोर कमी झाल्याचं पाहायला मिळालं. पण अशात आज पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर ठाणे, पालघरमध्ये हलका पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, उर्वरित महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडे असेल किंवा पावसाची रिमझिम पाहायला मिळेल. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम तर धारावीमध्ये हलका पाऊस पडेल तर विदर्भात पावसाने चांगलीच उघडीत दिल्याचे पाहायला मिळते.
बुधवारपासून तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील पावसावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी माहिती भारतीय हवामान विभागातर्फे मंगळवारी देण्यात आली.
बुधवारपासून राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होत असून रायगड, रत्नागिरीला बुधवार, गुरुवारसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीत या दोन दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गात मात्र गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्येही बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून गुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात शुक्रवारीही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल.