राज्यात सत्ता आल्यानंतर लाडक्या बहिणींचे पैसे वाढविणार; सुप्रिया सुळेंचे मोठं विधान

0

बारामती : मला काँग्रेससोबत कधीच अंतर वाटत नव्हते. ताटातले वाटीत आणि वाटीतलं ताटात होणार आहे. मला मिळाले काय आणि बंटी दादाला मिळाले काय? एकच होणार आहे. मात्र, बहिणीचं नातं महाराष्ट्रातल्या नेत्यांना कळाले नाही यातच दुःख आहे.
यांनी पंधराशे रुपये किंमत आमच्या नात्याला लावली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली.

शिरोळ येथील सभेप्रसंगी त्या बोलत होत्या. लोकसभेपर्यंत बहीण लाडकी नव्हती. हे माझ्यापेक्षा कुणालाही जास्त माहीत नाही, मात्र लोकसभेला तुम्ही दणका दिला आणि बहीण लाडकी झाली. आम्ही बहिणी फार स्वाभिमानी आहोत मोडू पण पैसासमोर वाकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सांगली, शिरोळ भागात आले की माझा भाऊ आर. आर. आबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आर. आर. आबा संकटात संपूर्ण महाराष्ट्राच्या कुटुंबासोबत उभे राहिले. हे ‘ते’ (अजित पवार) विसरले असतील पण मी विसरलेले नाही. मात्र, परवा आबांच्या बद्दल जे भाषण झाले त्याचे अत्यंत दुःख झाले आहे. मी सुमन वहिनींची फोन करून माफी मागितली, असल्याचे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

माझ्या नावावर एक ही साखर कारखाना नाही. पवार साहेबांनी जे साखर कारखाने काढले त्याची मालकी स्वतःकडे कधीही घेतली नाही. सत्ता आल्यानंतर लाडक्या बहिणींचे पैसे वाढवू, त्याबरोबर सुरक्षा देखील केली जाईल. वडिलांचा अधिकार प्रेमानं मागितला असता तर सगळे प्रेमानं देऊन टाकलं असते. मात्र, बहिणीचं नातं हेच तर त्यांना कळलं नाही.
हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला तर काही मिळत नाही. केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीत जे-जे असेल त्याची जीएसटी शून्य करू, असेही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.

जीएसटी कौन्सिलमध्ये फक्त अर्थमंत्र्याला बोलता येत नाही. मात्र, जीएसटी कौन्सिलमध्ये या राज्याचा अर्थमंत्री गेला नाही. माझ्या पांडुरंगाने माझ्या पदरात तुतारी टाकली आहे. माझी लढाई चिन्हासाठी नाही तर माझी लढाई तत्त्वासाठी आहे. एकुलती एक पोरगी मी कधी काही मागितलच नाही, मी समाधानी होते खासदारकीवर. बाकीच्यांना जे-जे पाहिजे होतं ते सगळं दिले. आमचा पक्ष नेला आमचे चिन्ह नेले, असेही त्या म्हणाल्या.
हा देश कोणत्याही अदृश्य शक्तीवर चालणार नाही तर बाबासाहेबांच्या संविधानावर चालणार आहे. यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आमच्यावर आहेत ते केवळ फोटो लावून किंवा भाषणातून दाखवायचे नसतात. मी मर्यादा पुरुषोत्तम रामाची भक्त आहे. पण यांनी कोणती मर्यादा पाळली हो? असा सवाल त्यांनी केला. त्यासोबतच महिलांबद्दल अर्वाच्य बोलणाऱ्या वाचाळवीरांच्या या सरकारला हद्दपार करा, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here