मुंबई : “एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार आणि लाळघोटेपणा करणारा गृहमंत्री राज्याला मिळाला आहे. उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून फडणविशी करणारा माणूस मंत्री म्हणून मिरवतोय. त्यांच्या कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तरी कुठे काही हलायला तयार नाही. यांची गुंडगिरी वाढत चालली आहे”, अशा आक्रमक शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली.
“लोकमतच्या पत्रकाराला धमकी मिळाली आहे. महिलांना मारहाण केली जात आहे. रोशनी यांना भेटलो. त्यांनी काहीही केलं नसल्याचं सांगितलं. त्यांच्याकडून माफी मागितल्याचा व्हीडिओ करण्यात आला. तोही त्यांनी करुन दिला. फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहायचा अधिकार नाही. त्यांच्या घरावर काही आलं तर एसआयटी नेमतात. बाजूच्या राज्यात जाऊन अटका केल्या जातात. त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले तर फडणविशी केली जात नाही. गुंडागर्दीचं राज्य आहे. गुंडमंत्री आहेत. गुंडांना सांभाळणारं खातं”, अशी टीका उद्धव यांनी केली.
“शिवसैनिक शांत राहिले म्हणजे सर्वोच्च न्यायालय म्हणते तसे नपुंसक नाहीत. मनात आणलं तर ठाण्यातून यांना उखडून टाकण्याची ताकद आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. बिनकामाच्या आयुक्तांना सांगायचं आहे की शपथेशी प्रतारणा आहे. त्यांचं निलंबन करा किंवा त्यांची बदली करा. कणखर असा आयुक्त ठाण्याला द्या. गृहमंत्री लाळघोटे नसतील, तर त्यांनी कार्यवाही करावी. ते परवा काहीतरी म्हणाले. लोक तुमच्या कारभारावरती थुंकतील. ते एवढं साचेल की लाळेने भरलेला चेहरा घेऊन लोकांसमोर जावं लागेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“कोर्टाने सरकारला नपुंसक म्हटलं होतं. आता सरकारच नपुंसक म्हटल्यावर अपेक्षा कोणाकडून करायची. ठाण्याची ओळख शिवसेनेचं ठाणं अशी करुन देण्यात येते. जीवाला जीव देणाऱ्या आणि महिलांचं रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांचं ठाणं अशी ओळख आहे. धर्मवीर आनंद दिघेंचं ठाणं अशीही ओळख आहे. पण ही ओळख पुसून गुंडांचं ठाणं अशी ओळख झाली आहे. आजपर्यंत गँग शब्द ऐकला आहे. आता महिलांची गँग होतेय म्हटल्यावर ठाण्याचं, शहराचं, राज्याचं, देशाचं काय होणार असा प्रश्न पडला आहे”, असं उद्धव म्हणाले.
“त्यांनी काहीही करावं आणि आम्ही ऐकून घ्यावं असं चालणार नाही. तुमची गुंडगिरी आम्ही ठाण्यातून, राज्यातून फेकून देऊ शकतो. शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर तोतया शिवसैनिकांची अवस्था वाईट होईल. बाळासाहेबांचे फोटो घेऊन जे नाचत आहेत त्यांना हातात भगवा आणि बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हटल्यावर महिला गुंडांकरवी हल्ला केला. यांना नपुंसकच म्हणायला हवं”, असं ते म्हणाले.
“आयुक्तालयात गेलो, आयुक्तच नाहीत. गुंड म्हणतो अशा महिला आपल्या संस्कृतीचा भाग नाहीत. रोशनी यांनी ज्यांनी हल्ला केला त्यांची नावं दिली आहेत. व्हीडिओमध्ये सगळं रेकॉर्डही झालं आहे. सगळ्यात गंभीर भाग म्हणजे रोशनी गरोदर होत्या. त्या महिलांना त्यांनी पोटावर मारु नका असं सांगितलं. पण तरीही महिला गुडांनी पोटावरही मारहाण केली. हे निर्घूण काम करणारी माणसं ही ठाण्यात काय महाराष्ट्रातही राहायच्या लायकीची नाहीत. आयुक्त सरकारचा घटक आहेत. ते सरकारप्रमाणेच वागत आहेत”, असं उद्धव म्हणाले.