राज्य सहकारी संघाच्या संचालकपदी थोरात कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांची निवड

0

संगमनेर : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालकपदी देशातील सहकारासाठी आदर्शवत असणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांची निवड झाली आहे.

          काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम उच्चांकी भाव देताना ऊस उत्पादक, सभासद, कामगार यांची हित जोपासले आहे. नुकताच या कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरचा उत्कृष्ट ऊस विकासाचा पुरस्कार प्राप्त झाला असून कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनाही उत्कृष्ट कार्यकारी संचालक म्हणून गोवा येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन, नियोजन, काटकसर आणि पारदर्शकता यामुळे हा कारखाना कायम इतरांसाठी दिशादर्शक राहिला आहे. गतवर्षी गळीत हंगामात १५ लाख ५३ हजार मॅट्रिक टनाचे उच्चांकी गाळप करताना कारखान्याने नुकताच दिवाळीमध्ये कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना १७६ रुपये प्रति टन प्रोत्साहन पर अनुदान दिले आहे. त्याचबरोबर कामगारांसाठी २०% बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या माध्यमातून सहकारी साखर कारखान्याची गुणवत्ता वाढ ,शेतकरी व साखर कारखान्यांच्या समस्या, शेतकऱ्यांना रास्त भाव ,उसाला  देण्यात येणारा एफ आर पी, कारखान्यांना मिळणारा वित्तीय पुरवठा, यातील व्यावहारिक अडचणी, साखर निर्यातीचे प्रश्न अशा विविध प्रश्नांबाबत केंद्र व राज्य सरकारकडे प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचे काम राज्य सहकारी महासंघ करत असतो. तसेच कारखान्याची गुणवत्ता वाढावी व त्यांचा आर्थिक वाणिज्य विषय कारभार अधिक विकासाभिमुख व्हावा यासाठीही या संघाच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जातात. अशा या साखर संघावर बाबा ओहोळ यांची संचालकपदी निवड झाली आहे. यापूर्वी त्यांनी संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. या निवडीबद्दल काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ सुधीर तांबे ,बाजीराव पा.खेमनर, ॲड माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख,सत्यजित तांबे, इंद्रजीत  थोरात, अमित पंडित, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, संपतराव डोंगरे, शंकरराव पा खेमनर, लक्ष्मणराव कुटे, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे नवनाथ अरगडे, रामहरी कातोरे ,कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे ,सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.