राधानगरी भरले, दूधगंगेतून पाणी सोडले; कोल्हापूरला पुराचा धोका

0

राधानगरी : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी दिवसभर धुवांधार पाऊस कोसळत असून, पंचगंगा कोणत्याही क्षणी धोका पातळी (४३ फूट) ओलांडणार आहे. राधानगरी धरण ९५ टक्के भरल्याने स्वयंचलित दरवाजे खुले होणार असून, दूधगंगेतून पाणी सोडले आहे.
वारणा धरणातूनही ८८७४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी विस्तीर्ण पसरले आहे. तब्बल ६३ मार्गांवरील वाहतूक थांबल्याने निम्मा जिल्हा ठप्प झाला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, पूरबाधीत गावातील नागरिकांना हलवण्यात आले आहे.
जिल्ह्यात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पावसाचा जोर वाढला आहे. एकसारख्या सरी कोसळत असून, धरणक्षेत्रात, तर अक्षरश: झोडपून काढले आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी खुले होण्याची शक्यता आहे. दूधगंगा धरण ७१ टक्के भरले असून, पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वीज निर्मितीसाठी प्रतिसेकंद १६०० घनफूट पाणी दूधगंगेत येत आहे. वारणा धरणातून अगोदरच प्रतिसेकंद ३८०० घनफूट विसर्गात वाढ करून वक्र दरवाजातून ७२१६ क्युसेक व विद्युत जनित्रमधून १६५८, असे एकूण ८८७४ घनफूटचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आल्याने पुराच्या पाण्यात वाढ झाली आहे.

पडझडीत ४९.५९ लाखांचे नुकसान

जिल्ह्यात एका सार्वजनिक मालमत्तेसह १४३ खासगी मालमत्तांची पडझड होऊन तब्बल ४९ लाख ५९ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

एसटीचे २० मार्ग बंद

महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने एसटीचे २० मार्ग बंद राहिले आहेत. यामध्ये कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर ते रत्नागरी या मार्गांचा समावेश आहे.

असे आहेत मार्ग बंद..

राज्य मार्ग – १०
प्रमुख जिल्हा मार्ग – २४
इतर जिल्हा मार्ग – ७
ग्रामीण मार्ग – २२ 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here