सातारा/अनिल वीर : जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने रविवार दि.१६ रोजी सकाळी ११ वा.येथील राष्ट्रभाषा भवनच्या मुख्य सभागृहात मान्यवरांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थान वैभव राजेघाटगे (सहसचिव, गृहविभाग, उपमुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय,मुंबई) भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीपराव पवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रा. श्रीधर साळुंखे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहणार आहेत.याशिवाय,अध्यापक मंडळ व इतर सात सहयोगी संस्थाचे पदाधिकारी व कार्यकारिणी उपस्थित राहणार आहेत.
सदरच्या कार्यक्रमामध्ये चार मुख्याध्यापक, हिंदी शिक्षक यांचा सेवापूर्ती व त्यांनी हिंदी अध्यापक मंडळ व अन्य सहयोगी संस्थाच्या कार्यात दीर्घ काळ दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे.त्याचबरोबर खटाव तालुक्यातील बुध गावचा सुपुत्र राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अभिषेक सूर्यवंशी व त्यांच्या माता-पित्याच्या गौरवही करण्यात येणार आहे.मुख्याध्यापकपदी बढती मिळालेल्या हिंदी शिक्षकांचाही सपत्नीक सत्कार केला जाणार आहे.तेव्हा सर्व निमंत्रित मान्यवरांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष ता.का. सूर्यवंशी व कार्यवाह अनंत यादव यांनी केले आहे.