उरण दि २९ (विठ्ठल ममताबादे) : हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व अशी विचारधारा अंगी बाळगणा-या व जगातील हिंदूची सर्वात मोठी व प्रभावशाली संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सर्वांना सुपरिचित आहे. राष्ट्रीय स्वयं सेवक संघा तर्फे वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.त्यापैकी दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन हा एक महत्वाचा कार्यक्रम देशभरात सर्वत्र राबविला जातो
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात दि २९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८:३० वाजता देऊळवाडी, शंकर मंदिर येथून पथसंचलन सुरु झाले.गणपती चौक, राजपाल नाका चारफाटा , कामठा रोड,एन आय हायस्कूल, स्वामी विवेकानंद चौक, गणपती चौक व शेवटी पुन्हा शंकर मंदिर देऊळवाडी या मार्गाने पथसंचलन झाले. सर्व स्वयंसेवक यावेळी गणवेशात होते. पथसंचलनात सर्व वयोगटातील स्वयंसेवक सहभागी झाले होते. देऊळवाडी शंकर मंदिर येथे या पथसंचलनाचा समारोप झाला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यानंतर देशातील नागरिकांना अनुशासनाचे धडे मिळावे, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथ संचलन करण्यात येते.पथ संचलनाची ही परंपरा १९२५ या सालापासून सुरु आहे.इतरवेळी होणारे संचलन आणि दसऱ्याच्यावेळी होणारे संचलन यात मोठा फरक असतो. इतरवेळी स्वयंसेवकांची संख्या कमी असते, मात्र दसऱ्याला होणाऱ्या संचलनात स्वयंसेवकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून सरकारी नियमानुसार संचलन रद्द करण्यात आले आहे. संचलनामध्ये २१ स्वयंसेवकांचा एक गण असतो. तीन गणांमिळून एक वाहिनी तयार होते, तर तीन वाहिन्यांमिळून एक अनितीनी तयार होत असते. संचलनात घोष हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. घोषाच्या लयबद्ध चालीवर स्वयंसेवक संचलन करीत असतात. अनेकदा कोजागरी पौर्णिमा, संघ शिक्षा वर्ग, वर्ष प्रतिपदा अशा वेळी संचलनाचे आयोजन केले जाते. उरण तालुक्यात दरवर्षी संचलन होत असते. यात कमीत कमी दीडशे ते दोनशे स्वयंसेवक सहभागी होत असतात. संघाच्या गणवेशात शिस्तबद्ध होणाऱ्या संचलनाची नागरिक आतुरतेने वाट पहात असतात. काही ठिकाणी फुलांचा वर्षाव करून संचलनाचे स्वागत केले जाते. याठिकाणी भगवा ध्वज व रक्षक हे केंद्र स्थानी असतात.