नगर-मनमाड महामार्ग आणखी किती बळी घेणार प्रवाशांचा संतप्त सवाल ! देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी येथील जोगेश्वरी आखाडा येथील काकाच्या धाब्यासमोर मालवाहतूक करणारा ट्रक व दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात बाप लेकासह नातवाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.सायरस प्रविण जाधव या शालेय विद्यार्थ्याचे शिक्षण अपुरेच राहिले. नगर-मनमाड महामार्ग आणखी किती बळी घेणार असा प्रश्न प्रवाशांनी अपघात स्थळी उपस्थित केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की,नगर-मनमाड मार्गावर नगर-ते कोपरगाव दरम्यान अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. एकेरी वाहतूक ठिकाणी वाहनांची गर्दी वाढत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.सोमवारी सकाळी कंटेनरच्या धडकेत कोपरगाव तालुक्यातील एक महिला जागीच ठार झाली तर त्या महिलेचा तरुण मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेला पूर्ण एक दिवस होत नाही. तोच अवघ्या एक हजार फुटाच्या अंतरावर मंगळवारी दुपारी ४ वाजता दुसरा अपघात झाला असून या अपघातात बाप लेकासह नातवाचा मृत्यू झाला आहे.
मालवाहतूक ट्रक एम एच 16 सीडी २०६६ हिने दुचाकीस्वार एम एच 16 बीपी ९२०१ यास जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाले आहे.मृतांमध्ये प्रकाश मोहन ठोकळ(वय- ६५) शुभम प्रकाश ठोकळ(वय- २५) या बापलेकासह सायरस प्रविण जाधव (वय-५) या नातवाचा समावेश आहे. यातील दोघे जण पाथर्डी तालुक्यातील मोहोज येथील आहे.तर लहान मुलगा हा प्रकाश ठोकळ यांच्या मुलीचा मुलगा असुन शिर्डी-कोपरगाव परिसरातील एका वसतिगृहात शिक्षणासाठी पोहोच करण्यासाठी चालले हा असताना हा अपघात घडला.
अपघात घडताच परिसरातील नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. साई प्रतिष्ठान, शिवबा प्रतिष्ठान व शासकीय रुग्णवाहिकांद्वारे या तिघांना राहुरी ग्रामीण उपचारासाठी नेले असताना तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तिघांना मृत म्हणून घोषित केले.या अपघातानंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.
चौकट
रस्ता दुरुस्त करून एकेरी वाहतूक बंद करावी
राहुरी शहरापासून काही अंतरावर असलेल हॉटेल आकाश ते गुंजाळ नाका पर्यन्त नगर-मनमाड एकेरी वाहतूक केली जात असल्याने सातत्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. राज्यकर्ते नगर-मनमाड मार्गवर किती नागरिकांचा बळी घेणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने दुरुस्ती करावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या अहमदनगर येथील नॅशनल हायवेचे अभियंत्याला काळे फासू असा तालुकाध्यक्ष संतोष चोळके यांनी दिला आहे.