दर सोमवारी व शुक्रवारी आयोजन.,२९ जुलै रोजी उरण आगारात साजरा होणार प्रवाशी राजा दिन व कामगार पालक दिन.
उरण दि १३(विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने दि. १५ जुलै २०२४ पासून प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी ” प्रवासी राजा दिन” व ” कामगार पालक दिन” आयोजित करण्यात येणार आहे. सदर उपक्रमास विभाग नियंत्रक आगारात जाऊन प्रवाशांच्या व रा.प. कर्मचा-यांच्या समस्या, तक्रारी व सूचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होईल! असे मत एस.टी. महामंडळाचे मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केले आहे.
रा.प. मुंबई विभागातील आगारात विभाग नियंत्रक ” प्रवासी राजा दिन “व कामगार पालक दिन ” साजरा करण्याकरिता खालीलप्रमाणे वेळापत्रक जाहीर करीत आहोत.
आगार उपक्रम राबविण्याची तारीख व वार :-
१) कुर्ला ने. नगर, दिनांक १५.०७.२०२४ सोमवार २) परळ, दिनांक १९.०७.२०२४,शुक्रवार ३) मुंबई,दिनांक २२.०७.२०२४,सोमवार ४)पनवेल,दिनांक २६.०७.२०२४,शुक्रवार ५)उरण, दिनांक २९.०७.२०२४ सोमवार
वरील दिलेल्या वेळापत्रकानुसार रा.प. आगारात सकाळी १०.०० ते १४.०० या वेळेत “प्रवासी राजा दिन ” साजरा करण्यात येणार असून सदर वेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा- महाविद्यालये आपल्या समस्या, तक्रारी सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतात. व प्रवासी राजा दिन झाल्यानंतर दुपारी १५.०० ते १७.०० या वेळेत कामगार पालक दिन’ साजरा करण्यात येणार असून सदर वेळेत संघटना व रा.प. कर्मचा-यांच्या वैयक्तिक बाबतीतील प्रश्न,रजा मंजुरी, कर्तव्यासंबंधी, वेळापत्रकासंबंधी व तत्सम तक्रारी लेखी स्वरूपात घेऊन तक्रारीचे तात्काळ निराकरण करतील. तरी सर्व प्रवाशी बंधु भगिनींनी व रा.प. कामगार यांनी याचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे एस.टी. महामंडळ रा.प. मुंबई विभागामार्फत आवाहन करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक मुंबई विभाग श्रीमती मोनिका वानखेडे व उरण आगारचे व्यवस्थापक अमोल दराडे यांनी दिली आहे.