लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच बोजवारा

0

बहीण लाभापासून वंचित; बँक कर्मचारी मागत आहेत शासकीय अध्यादेशाची प्रत

सातारा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्र्यांचे मूळ गाव असलेल्या सातार्‍यातच बोजवारा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. एका लाभार्थी महिलेस बँक कर्मचार्‍यांनीच अध्यादेशाची प्रत दाखविण्यासाठी वेठीस धरल्याची गंभीर घटना घडली आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने या महिलेस न्याय मिळवून दिला आहे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त महिला वर्गास आर्थिक आधार असावा, यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची संकल्पना मांडली. या योजनेस भाजप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसाठी चक्क अर्थसंकल्पात तशी तरतूद केली. यामुळे लाडकी बहीण योजना राज्यात अस्तित्वात आली. यानंतर या योजनेमध्ये कोणत्याही कारणास्तव न अडवता लाडक्या बहिणीचे पैसे संबंधित महिलेला मिळतील, अशा सूचना सर्व बँकांना करण्यात आल्या. तसा अध्यादेशही काढण्यात आला.

मुख्यमंत्री शिंदे यांच्याच सातारा जिल्ह्यातील सातारा शहरात वास्तव्यास असणार्‍या राणी विक्रम गवळी या संगमनगर परिसरात राहणार्‍या महिलेचे कोडोली येथील गणेश चौकातील एसबीआय बँकेत खाते आहे. आधार क्रमांकानुसार या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेही. मात्र बँकेने खूप दिवस खाते बंद असल्याचे कारण देत हे पैसे दुसरीकडे वळवले. वास्तविक पाहता जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी खास पत्रकार परिषद घेवून कोणत्याही बँकेने लाडकी बहीण योजनेचे पैसे अडवून अथवा इतरत्र वळवायचे नाहीत. तसे केल्यास संबंधितावर कारवाईचा इशारा दिला होता. याची दखल सर्व माध्यमांनी घेत या बातमीला चांगलीच प्रसिद्धी दिली होती. असे असताना राणी गवळी यांचे पैसे बँकेने इतरत्र वळवले. गवळी या पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्या असता त्यांना संबंधित अध्यादेशाची मागणी करण्यात आली. अध्यादेश नाही म्हणताच त्यांची बँकेतून बोळवणही करण्यात आली. मात्र त्यांनी आपल्यासारखी परिस्थिती कोणत्याही इतर महिलेवर उद्भवू नये, यासाठी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष सरदार (सागर) भोगांवकर यांना ही परिस्थिती कथन केली.

महिलेने दिलेल्या माहितीवरुन भोगावकर यांनी संबंधित महिलेसह तडक जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तेथे निवासी उप जिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेवून त्यांना याबाबतची माहिती दिली. यानंतर निवासी उप जिल्हाधिकार्‍यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधितांना त्याबाबतच्या सूचना दिल्या. मात्र, भोगांवकरांनी एवढ्यावरच न थांबता गवळी यांच्यासह एसबीआय बँक गाठली. तेथील कर्मचार्‍यास त्या अध्यादेशाची प्रतही देण्यात आली. यावेळी ब्रँच मॅनेजर यांनीही संबंधित लाभार्थीस सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. या सर्व घटनेनंतर लाभार्थी महिलेने सागर भोगांवकर यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here