जालना : “महाविकास आघाडी सरकारच्या काळातही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आलं होतं. पण आम्ही कधीच आंदोलकांना लाठीमार केला नव्हता. सध्याचं सरकार हे निर्घृण सरकार आहे. तुम्ही कुणावर गोळ्या चालवत आहात. लोकांच्या केसाला धक्का जरी लागला तरी अख्खा महाराष्ट्र इथं आणून उभा करीन”, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
ठाकरे यांनी आज जालना येथील अंतरवाली सराटी येथे पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते. “गणेशोत्सवात संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे, त्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, “एक फुल दोन हाफ सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार होता. त्याच्यासमोर ही अडगळ नको, म्हणून ते तुम्हाला जबरदस्तीने उठवायला निघाले होते.”
शासन आपल्या दारी कार्यक्रमावर बहिष्कार
उद्या (3 सप्टेंबर) बुलढाण्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हजर असणार आहेत. मात्र, सकल मराठा समाजाच्या वतीने शासन आपल्या दारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. त्यासोबतच बुलडाणा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.
बुलडाणा जिल्ह्यात जालना येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन होणार आहे. त्यामुळं बुलढाण्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुलडाणा येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात एक लाख लाभार्थ्यांना मदतीचे वाटप होणार आहे. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना 17 कोटींची मदत केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
रोहित पवार उपोषणकर्ते मनोज जरांगेंच्या घरी
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मराठा आंदोलकांवर लाठीमार झालेल्या अंबड तालुक्यातील अंकुशनगर, वडिगोद्री या गावांना भेटी दिल्या. याबाबत रोहित पवारांनी सोशल मीडियावरून माहिती दिली.
रोहित पवार यांनी या भेटीनंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली की, “उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.या ठिकाणी नागरिकांशी, सामजिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता या भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे जाणवले.”
रोहित पवारांनी पुढे सांगितलं की, “पोलिसांनी लाठीचार्ज करताना महिला आहेत का पुरुष आहेत ते बघितले नाही. वयोवृद्ध नागरिकांना आणि लहान मुलांनादेखील मारहाण करण्यात आली. उपचार करणाऱ्या डॉक्टरला देखील मारहाण करण्यात आली. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात छऱ्यांचा वापर करण्यात आला.
“छरे लागलेल्या युवकांच्या जखमा बघून आपल्याच नागरिकांवर अशाप्रकारे छरयांचा वापर करता येतो का, हा प्रश्न पडतो. पुढच्या आठवड्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कुठलाही व्यत्यय नको म्हणून आंदोलन अमानुषपणे चिरडले असल्याची तसेच वरिष्ठांच्या आदेशानेच पोलिसांनी एवढी टोकाची भूमिका घेतल्याची भावना अनेक युवकांनी व्यक्त केली. या सर्व युवकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. शासनाने देखील घटनेकडे गांभीर्याने बघायला हवे.”