सातारा/अनिल वीर : वेगवेगळे साहित्य वाचन केल्याने आयुष्य बदलून जाते. वाचनामुळे आपल्या भावना कोमल होतात. असे प्रतिपादन लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी केले.
येथील औद्योगिक वसाहतीमधील लोकमंगल हायस्कूल व प्राथमिक विद्या मंदिरमध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.तेव्हा प्रमुख वक्ते म्हणून शिरीष चिटणीस बोलत होते.
यावेळी मुख्याध्यापिका नंदा निकम व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती नलवडे यांची प्रमुख उपस्थित होती.
चिटणीस पुढे म्हणाले, पूर्वी लोक वाचन करीत होते. मात्र, आता आधुनिक युगामध्ये लोक वाचनापासून लांब जात आहेत. वाचन केल्याने आपल्या जीवनामध्ये समृद्धपणा येतो. मोठी माणसे वाचनानेच मोठी झाली. वाचनातून आयुष्यामध्ये मिळालेल्या संधीचा उपयोग केला पाहिजे. वाचन आपल्यापुरते मर्यादित न ठेवता दुसऱ्यांना ज्ञान देता आले पाहिजे. विद्यार्थ्यांनी दररोज किमान एक तास वाचन केले पाहिजे. ऐकणेसुद्धा वाचन प्रेरणा दिवस ठरू शकतो. त्यामुळे वाचनाबरोबर इतरांचे विचारही ऐकून घेण्याची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे.
यावेळी प्रदीप लोहार, संगीता कुंभार या शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली.सदरच्या कार्यक्रमास उदय जाधव, काका निकम, भास्कर जाधव, अभिजीत वाईकर, यश शिलवंत, बाळकृष्ण इंगळे, सतीश पवार, चंद्रकांत देवगड, ज्ञानेश्वर मोहटकर, संदीप जाधव, हणमंत खुडे, वैशाली वाडीले आदी उपस्थित होते.प्रतिभा वाघमोडे यांनी सूत्रत्रसंचालन केले. गुलाब पठाण यांनी आभार मानले.
फोटो :मार्गदर्शन करताना शिरीष चिटणीस शेजारी मान्यवर.(छाया-अनिल वीर)