अनिल वीर सातारा : वाचन संस्कृती वाढविण्याचा पॅटर्न ठरलेल्या सातारा ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून शिक्षक,पालक व थोरामोठ्यांनी नवीन पिढी घडविण्यासाठी पुढाकार घेणे क्रमप्राप्त आहे.असे प्रतिपादन एबीपी माझा वृत्तवाहिनीचे प्रमुख संपादक राजीव खांडेकर यांनी केले. येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर २४ वा ग्रंथमहोत्सव उद्घाटन खांडेकर यांच्या हस्ते झाले.तेव्हा ते मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी कविवर्य प्रवीण दवणे होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन,माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कविवर्य प्रवीण दवणे म्हणाले, “यापुढे सातारा कंदी पेढ्यापेक्षा ग्रंथमहोत्सवामुळे ग्रंथाचे पेढे म्हणून सातारची ओळख राहील.मानवाने स्वधर्म म्हणून कार्यरत राहिले पाहिजे.कल्पनेत गुंतून न राहता मिळालेल्या संस्काराचा आविष्कार समाजात दरवळला पाहिजे.मिळालेले ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे. प्रत्येकांनी विश्वकोशास भेट दिली पाहिजे.ग्रंथमुखी असले तरी ते बोलतात.ग्रंथांच्या भिंती निर्माण झाल्या पाहिजेत.चातुर्य असावे. मात्र,चलाखी नसावे.सर्व माध्यमात कागदावरचा मजकूर खरा-खुरा असतो.घराघरात संस्कृती वाढली पाहिजे. आई-वडील दिसणे हेच आपले जगणे असले पाहिजे. इच्छाशक्तीपुढे पैसे फिके पडतात.व्यक्तिमत्व घडविण्यासाठी व्यक्त झाले पाहिजे. वाचनाचे पर्यावरण झाले पाहिजे.”
प्रारंभी ग्रंथ दिंडीचे आयोजन गांधी मैदानापासून केले होते.विविध कार्यक्रमात शाळांनी सहभाग घेतला होता.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रंथप्रेमी उपस्थीत होते. शंभरहून अधिक स्टॉलमधील विविध प्रकारच्या पुस्तकांच्या सानिध्यात आणि भरगच्च साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मांदियाळीत ग्रंथ महोत्सव सुरु झाला आहे. पुस्तकांची कोट्यवधी रुपयांच्या विक्री उलाढाल या महोत्सवात होत असते. या सर्वांच्या उपस्थितीमुळे ग्रंथ महोत्सवाचे उदघाटन रसिकांना मेजवानीच मिळाली आहे.दुपारी कथाकथन कार्यक्रमात रवींद्र कोकरे व राजेंद्र कणसे या प्रमुख कथाकथनकारांसह निवडलेल्या निवडक कथाकारांचे सादरीकरण करण्यात आले. सायंकाळी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याविषयी साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी मार्गदर्शन केले.सरतेशेवटी सप्तसुरांची इंद्रधनु ही मराठी हिंदी गीतांची सुरेल मैफिल झाली.ग्रंथमहोत्सव यशस्वी करण्यासाठी कार्यवाह शिरीष चिटणीस, डॉ.राजेंद्र माने,प्रदीप कांबळे, वि.ना.लांडगे आदी समितीचे पदाधिकारी अथक असे परिश्रम घेत आहेत.