सोलापूर : पंढरपुरातील विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन शेकडो किलोमीटर पायी चालत लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात. शेकडो पालख्यांच्या माध्यमातून हे आलेले वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान, वारकऱ्यांना पायी चालून त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्यांना आराम मिळावा यासाठी फूट मसाज मशीन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. हळूहळू पालखी सोहळे पंढरपूर शहराच्या दिशेने जवळजवळ येत आहेत. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला आवश्यक सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे.
पालखी मार्गावर स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेशी शौचालये, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. हिरकणी कक्षाच्या माध्यमातून महिला वारकरी मंडळी तसेच लहान मुलांसाठी उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच वारकरी भाविकांना वारीत कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. फूट मसाज मशीनचा लाभ दररोज शेकडो वारकरी घेत आहेत. या मसाजमुळे अनेक वारकऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या सेवेचे कौतुक करून समाधान व्यक्त केले आहे.