३१ मार्च २०२५ पर्यंत असणर मुदत
अहिल्यानगर प्रतिनिधी – वाहनांच्या नंबर प्लेट मध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे आणि रस्त्यावर धावणाऱ्या वाहनाची ओळख पटविण्याकरिता १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी)बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून वाहनांना नंबर प्लेट बसविण्याकरिता जिल्ह्यासाठी सेवा पुरवठादार एफटीए एचएसआरपी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
एचएसआरपी नंबरप्लेट बुकींग करिता संकेतस्थळ https://maharashtrahsrp.com असे आहे. तसेच, अधिकृत फिटमेंट सेंटर्सची यादी https://transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रकाशित केली असून या संकेतस्थळावर नमूद एचएसआरपी उत्पादकांकडून अर्जदारांना अर्ज भरणे, शुल्क अदा करणे, आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेणे, अपॉईंटमेंट घेणे, अपॉईंटमेंटची तारीख बदलणे, सदर प्रक्रीयेबाबत अर्जदाराच्या तक्रारी नोंदवणे याकरिता स्वतंत्र पोर्टल विकसीत करण्यात येत आहे. एचएसआरपी बुकींग करिता वाहनाची अचूक व योग्य माहितीसह विहीत शुल्क भरणे आवश्यक आहे. सदर प्रक्रियेत प्रत्यक्षात वाहनांवरील माहिती व अर्जात भरलेली माहिती यात तफावत आढळून आल्यास भरलेले शुल्क जप्त करण्यात येणार आहे. तसेच बुकींग करुन ९० दिवसांचे आत एचएसआरपी नंबर प्लेट प्रत्यक्षात वाहनांस न बसविल्यास देखील जमा केलेले शुल्क जप्त होऊन एचएसआरपी नंबर प्लेटचे निंदणीकरण होणार आहे. केवळ अधिकृत एचएसआरपी उत्पादकांकडूनच बसविलेली एचएसआरपी नंबर प्लेटच अधिकृत मानली जाईल.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी दुचाकी वाहन व ट्रॅक्टर्ससाठी ४५० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये आणि चारचाकी, प्रवासी चारचाकी, ट्रक, ट्रेलर्स व इतर वाहनांसाठी ७४५ रुपये इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे. सर्व वाहनधारकांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत अधिकृत फिटमेंट सेंटरद्वारे जून्या नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन अहिल्यानगरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.