विद्यार्थी घडवून गावातल्या शिक्षण व्यवस्थेचे केंद्रबिंदू व्हा! : आयुक्त सुरज मांढरे 

0

शिक्षक भरतीसाठी पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही २५ डिसेंबरपर्यत पूर्ण होणार , येवल्यात आमदार दराडेच्या पुढाकाराने उत्तर महाराष्ट्रातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा

येवला / प्रतिनिधी :

 राज्यभरातील शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही २५ डिसेंबरपर्यत पूर्ण होणार आहे.लवकरच रिक्त पदे भरली जाणार आहे.शिक्षकांकडे वारंवार विविध माहिती मागितली जात असल्याने अध्यापनावर परिणाम होत असून ते टाळण्यासाठी सर्व सुविधा नियुक्त मोठे सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे.परीक्षांचे सुपर व्हिजन,विद्यार्थ्यांचे निकालासह इतर सुविधा त्यात देण्याचा मानस असल्याची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली.शिक्षकांचे प्रश्न सुटतील पण विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तर त्यांचे भविष्य काय हा सवाल करून विद्यार्थ्यांचा खुर्दा होण्यासाठी शिक्षण व्यवस्था जवाबदार होऊ देऊ नका.प्रयोगशील व लोकप्रिय होऊन गावातल्या शिक्षण व्यवस्थेचे केंद्रबिंदू व्हा असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.

शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या संकल्पनेतून आज बाभूळगाव येथील एस.एन.डी. शिक्षण संकुलात आयोजित उत्तर महाराष्ट्रातील नाशिक,नगर,धुळे, जळगाव,नंदुरबार येथील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सहविचार सभेप्रसंगी ते बोलत होते.या सभेला उत्तर महाराष्ट्रातून सुमारे ३ हजार मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मांढरे होते तर व्यासपीठावर आमदार नरेंद्र दराडे,शिक्षक आमदार किशोर दराडे,माजी नगराध्यक्ष रामदास दराडे,नाशिकचे शिक्षण उपसंचालक डॉ.बी.बी.चव्हाण, नाशिकचे शिक्षणाधिकारी उदय देवरे व प्रवीण पाटील,नगरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस,प्राथमिकचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील,जळगावच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.किरण कुवर,प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील,नंदुरबारचे  शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे,नाशिकचे उपशिक्षणाधिकारी गणेश फुलसैंदर,वेतन अधीक्षक नितीन पाटील,नगरचे अधीक्षक रामदास मस्के तसेच मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के.पाटील,शिक्षक नेते संभाजी पाटील तसेच शालिग्राम भिरूड,सुनील पंडित,आप्पासाहेब शिंदे,आर.एस.बाविस्कर मातोश्री शिक्षण संस्थेचे सरचिटणीस कुणाल दराडे, जगदंबा शिक्षण संस्थेचे संचालक रुपेश दराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी आमदार किशोर दराडे तसेच आयुक्त श्री.मांढरे यांच्या हस्ते जळगाव,धुळे जिल्ह्यातील अनुकंपावरील शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात आले.

राज्यात दोन कोटी १७ लाख विद्यार्थी,सहा लाख शिक्षक आणि एक लाख शाळा असल्याने शिक्षकांकडे विविध प्रकारची वारंवार माहिती मागवली जाते.हे मोठे आव्हान असून या अशैक्षणिक कामांमध्ये पण शिक्षक गुंतले जातात.हे टाळण्यासाठी मोठे सॉफ्टवेअर विकसित केले जात असून वेळोवेळी माहिती त्यात अपडेट होणार आहे.शिक्षकांचे प्रश्न सुटतील पण विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तर त्यांचे भविष्य काय? त्यामुळे शिक्षक म्हणून मोठी आव्हाने असून शिक्षणावर परिणाम होऊ देऊ नका,जे दयायचे आहे ते प्रामाणिकपणे द्या.नव्या शैक्षणिक धोरणात अमुलाग बदल होणार असून भविष्यात स्पर्धा मोठी असल्याने येणाऱ्या पिढ्याना निरुपयोगी वस्तू तयार करू नका.सिलबस पूर्ण करणारे म्हणून नव्हे तर मुलांच्या मनात घर करणारे शिक्षक व्हा,आपल्या मुलांच्या बाबतीत वागता तसे वर्गातल्या मुलांच्या बाबतीत वागा असेही ते म्हणाले.

शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचा लढा सुरूच राहणार – किशोर दराडे

शिक्षण क्षेत्रापुढे अनेक आव्हाने असून ती आनंदी वातावरणात शिक्षकांनी पेलवत नव्या शैक्षणिक धोरणालाही उत्साहाने सामोरे जावे.शिक्षकांना बीपी,शुगरचा त्रास अधिक आहे मात्र स्वतःची तब्येत सांभाळतानाच तणाव विरहित काम करा आणि विद्यार्थी हिताला प्राधान्य द्या असे आवाहन शिक्षक आमदार दराडे यांनी केले गेले.साडेपाच वर्षे सतत शासन आणि अधिकाऱ्यांची भांडण तुमचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी झटत आहे याचमुळे विनाअनुदानित माध्यमिक शाळांना २० व ४० टक्के अनुदानासाठी ११३८ कोटी तर उच्च माध्यमिक शाळांना २० व ४० टक्के अनुदानासाठी १६५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात यश आले, २००५ पूर्वीच्या नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय झाला असून नव्याने नियुक्त शिक्षकांचे शालार्थ आयडी उपोषण करून मिळवून दिले, सभागृहात हजार वेळेस शिक्षकांचे प्रश्न मांडून त्याची सोडवणूक केली आहे.आता जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी माझा लढा सुरू असून तो सतत सुरूच ठेवेल, शिक्षकांचे असंख्य प्रश्न असून ते सोडवण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे दराडे यांनी सांगितले.

शिक्षक दिशादर्शक असतो,त्याने विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्याचे महान कार्य केले आहे.यापुढील काळात या कामात अधिक झोकून द्यावे लागेल असे आमदार नरेंद्र दराडे म्हणाले.नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होत आहे.काळाबरोबर तुम्हालाही बदलावे लागत असून नवीन प्रवाह समजून घ्या व ते स्वीकारा.त्याचा शिक्षण क्षेत्रात अवलंब करून आपली शाळा आणि आपल्या विद्यार्थ्यांना नेहमीच टॉपवर ठेवा. परीक्षा पद्धतीतही बदल होत असून सर्वच परीक्षा निकोप व स्वच्छ पारदर्शक वातावरणात पार पाडा असे असे आवाहन शिक्षण उपसंचालक डॉ. चव्हाण यांनी केले.

जुनी पेन्शन योजना लागू व्हावी,सेवानिवृत्तीचे वय ६० व्हावे,उर्वरित शिक्षकांना शालार्थ आयडी मिळावे,वैद्यकीय व इतर थकीत बिले मिळावीत,संच मान्यता दुरुस्त कराव्यात,समायोजन थांबवावे या शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी यावेळी शिक्षक नेते एस.बी.देशमुख,मोहन चकोर,जे.के.पाटील,साहेबराव कुटे,आर.डी.निकम,डी.पी.महाले,उदय तोरवणे,एस.टी.कदम,एस.के.सावंत, संभाजी पाटील,किरण पगार आदींनी यावेळी केली. सूत्रसंचालन  संतोष विंचू यांनी केले तर युवा नेते कुणाल दराडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here