विनोद तावडेंच्या गळ्यात पडणार भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ ?

0

मुंबई प्रतिनिधी : महायुतीचा महाराष्ट्रातील मुख्यमंत्रि‍पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, दुसरीकडे भाजपच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ज्यामुळे भाजपचे पुढील राष्ट्रीय अध्यक्ष विनोद तावडे असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपकडून  सध्याचे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांच्या केंद्रीय निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्या गळ्यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याचं बोललं जात आहे.

कारण सध्याचे विद्यमान अध्यक्ष जे.पी नड्डा आणि त्याआधीचे अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपण्याआधी अशीच केंद्रीय निरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे आता तावडे यांचीही निरीक्षकपदी नियुक्ती करून त्याबाबतचे संकेत पक्ष श्रेष्ठींनी दिल्याची चर्चा आहे.
भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ; अमित शाह आणि तावडेंच्या भेटीमुळे मुख्यमंत्रि‍पदाचा सस्पेन्स वाढला, नेमकी चर्चा काय ? मात्र, अध्यक्षपदाबाबतची कोणतीही अधिकृत भूमिका पक्षाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. तसंच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांचीही नावे आघाडीवर आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या आगामी मुख्यमंत्री कोण याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं तरीही अद्याप सत्ता स्थापन कधी होणार याचा निर्णय झालेला नाही.

त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री कोण करायचा यावरून भाजपच्या वरिष्ठांमध्ये खलबत सुरू असल्याची चर्चा आहे. एकीकडे मुख्यमंत्रि‍पदावरून शिंदेंची शिवेसना आणि भारतीय जनता पक्षात टोकाचे मतभेद असल्याचं बोललं जात होतं. मात्र, बुधवारी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेंनी  स्वत: आपला मुख्यमंत्रि‍पदावर दावा नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत अमित शाह हे राज्यातील मुख्यमंत्रि‍पदाबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी बोलून तोडगा काढणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे तावडे यांची उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांच्या केंद्रीय निरीक्षकपदी नियुक्ती केल्यामुळे भाजपच्या वरिष्ठांच्या मनात नेमकं काय सुरू आहे. याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
कारण विनोद तावडे यांचं नाव देखील राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा भाजपच्या गोटात दबक्या आवाजात सुरू आहे. शिवाय बुधवारी अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचे तावडे यांना तातडीने दिल्लीत भेटीसाठी बोलावल्यामुळे भाजप मुख्यमंत्रि‍पदाच्या निर्णयात धक्कातंत्र वापरणार असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here