विशाळगड नेमका कुणाचा ? खरी हकीकत काय? पानिपतकार विश्वास पाटलांनी थेट ब्रिटीश पुरावेच मांडले!

0

इम्तियात मोमीन,कोल्हापूर : कोल्हापुरातील विशाळगड परिसरात काही दिवसांपूर्वी हिंसक जमावाने तोडफोड केली असून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठा वाद सुरु झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे.
विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र, जमावाने केलेल्या हिंसाचारामुळे या मोहिमेला हिंसक वळण लागले होते. या वरून वाद सुरु असतानाच आता इतिहासकार विश्वास पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विशाळगडाचा इतिहासच मांडला आहे.
विश्वास पाटलांनी नेमकं काय म्हटलंय?
विशाळगडावरचा बाबा कोण ? तो दर्गा कोणाचा ? रेहानचा की मलिक उतगुजारचा ? खरी हकीगत काय? ब्रिटिश कागदपत्रातले पुरावे!
1886 मध्ये ब्रिटिशांनी आपल्या गॅझेटमध्ये पान क्रमांक 322 वर प्रसिद्ध केल्याप्रमाणे तेव्हाच्या विशाळगडावर 17 फूट लांब, पंधरा फूट रुंद आणि आठ फूट उंचीचा दर्गा होता. त्याची देखरेखीसाठी ब्रिटिश सरकारकडून नऊ पाउंड म्हणजेच त्यावेळीच्या दरानुसार 90 रुपयाचा खर्च केला जात असे. हा दर्गा हजरत मलिक रेहान पीर यांचा आहे. तिथे दरसाल उरुस भरतो. त्या उरसाला 300 ते 400 भाविक हजर असतात. या जागृत ठिकाणाला मुसलमान तसेच हिंदू भाविकही भेट देतात अशा स्पष्ट नोंदी आहेत.
इथे पूर्वी पंतप्रतिनिधींचा वाडा होता. तसेच भोज राजाने 6400 स्क्वेअर फुटांचा एक तलाव बांधला होता. शिवाय अर्धचंद्राच्या आकाराचा 17 बाय 15 बाय 8 फुटांचा आणखी एक तलाव आहे. हा दुसरा तलाव रामचंद्रपंत अमात्य यांनी बांधून घेतला होता.

येथील लोककथानुसार इसवी सन 1000 पर्यंत विशाळगडावर भोज या हिंदू राजाचे राज्य होते. त्याचे नाव तलावाच्या भिंतीवर कोरलेले आहे. तसेच मशिदीच्या भिंतीवर ही इमारत मलिक रेहान पीर यांच्या स्मरणार्थ बांधली गेल्याची नोंद आहे. त्याच आशयाचा एक पर्शियन शिलालेख सुद्धा पूर्वी तिथे कोरला गेला आहे. भोज नावाचा मराठा राजा या किल्ल्यावर राज्य करत होता. माझे नाव मलिक रेहान.
मी स्वतः या किल्ल्याला एकूण सहा वेळा वेढा घातला होता. मात्र तरीही हा किल्ला मला जिंकता आला नाही. जेव्हा मी सातव्यांदा वेढा घातला, तेव्हा मला हा किल्ला जिंकण्यामध्ये यश मिळाले.) त्या पर्शियन शिलालेखाचे इंग्रजी भाषांतर पन्हाळ्यावर राहणारे कोल्हापूरचे तेव्हाचे ब्रिटिश पोलिटिकल एजंट कर्नल जे डब्ल्यू वेस्टन यांनी केलेले आहे. याच वेळी दौलत बुर्जाबाबत आणखी एक शिलालेख आहे, त्याचे भाषांतर इंग्रजांनी केलेले आहे. पण सदभावना, सदविचार याबाबतच त्यात वर्णन आहे. त्या दौलतबुरुजाच्या शिलालेखात अन्य महत्वाची अशी ऐतिहासिक माहिती काही नाही.
मुसलमानांना या किल्ल्यावरचा ताबा राखता आला नाही. साधारण 1453 मध्ये अल्लाउद्दीनखान बहामनी याच्या मलिक उत्तजार नावाच्या सरदाराने विशाळगडावर हमला चढवला होता. मात्र शंकरराव मोरे नावाच्या एका सरदाराबरोबर जंगलामध्ये त्या दोघांचे घनघोर युद्ध झाले. सरदार मोरेने मलिकसह त्याच्या सैन्याचे तुकडे तुकडे केले. त्यानंतर शंकररावचा पराभव मोहम्मद गवान नावाच्या आणखी एका बहामनी सरदाराने केला.
पुढे बहामणी घराण्याचा नाश झाल्यावर 1489 मध्ये हा विशाळगड विजापूरकरांच्या ताब्यात गेला. तेव्हापासून पुढे सलग पावणेदोनशे वर्षे तो विजापूरकरांकडे होता. शिवाजीराजांनी विशाळगड उर्फ खेळणा हा किल्ला 1659 मध्ये जिंकला. लगेच दोन वर्षांनी म्हणजे 1661 मध्ये विजापूरच्या फाजीलखान नावाच्या सरदाराच्या नेतृत्वाखाली हजारो विजापुरी सैनिक दीर्घकाळ वेढा देऊन बसले होते. जेव्हा त्या अयशस्वी वेढ्याची फौज जिथे उतरली होती. तिला बादशहाचा माळ म्हणतात.
मराठी भाषेत “सह्याद्री” नावाचा जोगळेकरांचा ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे. त्यामध्ये त्यांनी केलेल्या नोंदीनुसार मलिक उत्तजार याला बाजूच्या जंगलामध्ये सरदार मोरेने फसवून(शंकररावचे आडनाव मोरे की शिर्के यामध्ये इतिहासकारात मतभिन्नताआहे ) अशा ठिकाणी नेले की, ते पाचसहा हजार सैनिक अनेक दिवस अन्न अन्न करत जंगलात उपाशी मरत होते. एके रात्री मोरेच्या सैनिकांनी त्या सर्वांची कत्तल केली. जिथे मलिक उत्तजार मरण पावला. ज्या दगडावर त्याचे रक्त सांडले. त्या दगडाची पूजा केल्यावर तो बाबा गुराख्यांना व गावकऱ्यांना पावतो अशी या परिसरातील स्थानिक लोकांची श्रद्धा झाली. म्हणून आजूबाजूच्या इथल्याच रयतेने तो पाषाण विशाळगडावर आणला व तोच बाबा म्हणजे आताच्या मशिदीतील बाबा.
अर्थातच हा दर्गा रेहान बाबांचा आहे की, मलिकचा याविषयी संशोधन व्हायला हवे. मात्र 1881 ला सुद्धा दर्गा अस्तित्वात असल्याचे व 1881 च्या जनगणनेनुसार गडावर फक्त 121 लोक राहत होते अशी नोंद आहे. तिथे दोन्ही धर्मांचे लोक राहत होते. कोणत्याही किल्ल्यावर फाजील अतिक्रमणे होऊ नयेत असे माझे मत आहे. पण सर्व संबंधित जातीनी व धर्मीयांनी हा विषय भावनेचा न करता शास्त्रोक्त पद्धतीने, कागदपत्रे व मापे घेऊन, अतिक्रमणांची तारीख व अस्तित्व नक्की करावे. पण अतिक्रमणाच्या नावाखाली अतिरेकीपणा करू नये. कोणीही स्वतःच्या महत्वकांक्षांना खतपाणी घालण्यासाठी धार्मिक किंवा जातीय तेढ वाढवू नये.
पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये शिवा काशिद यांच्या आधी नेताजी पालकरांच्या नेतृत्वाखाली सिद्धी वाह वाह हा शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासाठी कामी आलेला पहिला इस्लामी हुतात्मा होता. विजापूरचा सिकंदर बादशहा हा स्वतःला सरस्वतीचा पुत्र मानायचा. तो स्वतः नृत्य शिकला होता. त्याने नवरसपूर नावाचे नवे ठिकाण तयार करून हिंदू गायनकला, शिल्पकला, चित्रे व्रंदीगत होण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यासाठी तेव्हाच्या अतिरेकी मुसलमानांकडून छळही सहन केला होता.

आपल्या इतिहासाचे व संस्कृतीचे सखोल स्तरही आपण समजून घ्यायला हवेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1630 पर्यंत विशाळगड जहागिरी हा सातारा जिल्ह्याचा म्हणजेच सातारच्या राजधानीं खालील भाग होता. 1631 च्या वारणेच्या तहानुसार तो कोल्हापुराकडे आला. 1844 मध्ये पन्हाळ्यावरचा आपला वाडा सोडून पंतप्रतिनिधी शाहूवाडीतील मलकापूर या ठिकाणी राहायला आले.
डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहिताना सर्वधर्म समभावाचे तत्त्वच अंगीकारले आहे. आपला कोल्हापूर परिसर ही छत्रपती शाहू राजांच्या प्रागतिक विचाराचा भाग आहे. त्यामुळे सर्वांनीच विशाळ गडासारख्या निर्माण झालेल्या नाजूक समस्यांचे निराकरण भावनेच्या आहारी न जाता सामंजस्याने करणे खूप गरजेचे आहे. कारण गावे बांधायला आणि समाजाची उभारणी करायला अनेक पिढ्यांना अनेक शतके खर्ची घालावी लागतात. ती जाळायला फारसा वेळ आणि बुद्धी खर्च करावी लागत नाही.
विश्वास पाटील 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here