मंगळवेढा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा असतो. तसेच दिलेला शब्द आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात पेरलेल्या कार्यकर्त्यांशी जोडली गेलेली नाळ जपण्याला पवारांचे आजदेखील प्राधान्य असते.
याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. पवारांनी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पश्चात त्याच्या नातवाच्या घरी तब्बल वीस वर्षानंतर भेट देत जेवणाचा आस्वाद घेतला.
स्व.गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यासाठी सोलापूरहून सांगोल्याकडे जात असताना त्यांनी मंगळवेढा येथे रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या निवासस्थानी जेवणाचा आस्वाद घेतला. 2003 साली पवार हे मंगळवेढा दौऱ्यावर आले असता रतनचंद शहा यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर तब्बल वीस वर्षानंतर त्यांचे नातू राहुल शहा यांच्या निवासस्थानी भेट दिली.
मंगळवेढा तालुक्यात सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिकाची अवस्था खराब आहे. ऊसाचा वापर चाऱ्यासाठी होत असून दुधाच्या उत्पन्नापेक्षा चाऱ्यावरील खर्चच अधिक असल्याने या भागात चारा छावणी किंवा चारा डेपो सुरू करण्यात यावेत. तालुक्यामध्ये अडीच लाखापेक्षा अधिक पशुधन असून या पशुधनाचे आरोग्य जतन करण्यासाठी तालुक्यामध्ये लघु पशु चिकित्सालय सुरू करण्यात यावे. रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी केली.
पवारांचे पाय वाड्याला….
दामाजी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहरातून जाताना घरासमोर कार्यकर्त्यांसमवेत अध्यक्ष पवारांचा सत्कार करण्याचे नियोजन केले होते. मात्र, पवारांनी थेट घरीच येऊन भेट दिली. पवारांचे पाय वाड्याला लागल्याचे मोठे समाधान लाभल्याचे रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे तत्पूर्वी दामाजी चौकात दामाजीचे दर्शन घेतले. यावेळी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी क्रेनच्या साह्याने पुष्पहार घालून मोठ्या शक्तिप्रदर्शनात स्वागत केले.अभिजीत पाटील त्यांनी मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर व चोकोबा स्मारक, मंगळवेढा उपसा सिंचन योजना आधी सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.सत्कारला उत्तर देताना अध्यक्ष पवार यांनी या मतदारसंघातील विकासासाठी आपली ताकद अभिजीत पाटील यांच्या पाठीशी उभे करा असे आवाहन केले.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, महेश कोठे, शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी, विद्या विकास मंडळ या संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, किसन गवळी, मुजफ्फर काझी, संदीप बुरकुल, नागेश राऊत,रविराज मोहिते, आयाज शेख,जमीर इनामदार,आदी उपस्थित होते.