शिरूर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी उमेदवाराच्या मुलाचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरूर हवेली मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं आहे.
मुलाचं अपहरण करून त्याला जबरदस्तीने विवस्त्र केलं यानंतर त्याच्यासमोर एका महिलेलाही विवस्त्र केलं आणि तिचे फोटो काढण्यात आले, असा आरोप अशोक पवार यांनी केला आहे. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे ही घटना घडली आहे.
अशोक पवार यांच्या मुलाला बेदम मारहाणही करण्यात आली आहे. ऋषीराज पवार असं अशोक पवार यांच्या मुलाचं नाव आहे. ऋषीराज पवार हे घोडगंगा साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. दरम्यान अपहरण प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. ऋषीराज पवारांच्या अपहरणाची बातमी मतदारसंघात वाऱ्याच्या वेगाने पसरली, यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला जमा झाले आहेत.