शरद पवारांनी परळीत येऊन धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं

0

परळी(बीड) : पक्षामध्ये गैरविश्वास निर्माण करणारे, समाजासमाजामध्ये अंतर निर्माण करण्याचे काम काहींनी केले. त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी परळीमध्ये केले आहे.
अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी यावेळी जोरदार निशाणा साधला. राजकीय संकटकाळात त्यांना मदत केली, याचाही उल्लेख शरद पवारांनी केला.

शरद पवार म्हणाले, “काही लोकांना राजकीय संकटाच्या काळात मदतीची आवश्यकता होती. त्यांना माझ्याकडून मदत केली गेली. पंडित अण्णा आणि धनंजय मुंडे एक दिवस मुंबईत माझ्या घरी आले. पंडित अण्णा म्हणाले की आमच्या काही अडचणी आहेत. त्यातून आम्हाला बाहेर काढा. हा माझा मुलगा आहे त्याच्यावर लक्ष ठेवा. त्या निमित्ताने परळीमध्ये एक नेतृत्व उभ राहील असं वाटलं म्हणून पंडित अण्णांची सूचना मी स्वीकराली. त्यांना पक्षात घेतलं, संधी दिली. विधान परिषदेचं आमदार केलं, विरोधी पक्ष नेता केलं. जेजे माझ्याकडून करता येईल तेते केलं. असं सांगून शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्यासाठी काय – काय केलं त्याची उजळणी परळीतील जाहीर सभेत केली. एक दशकानंतर शरद पवार परळीमध्ये जाहीर सभेला संबोधित करत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर परळीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात शरद पवार गटाने राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यामध्ये धनंजय मुंडे जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष आरोप शरद पवारांनी केला. ते म्हणाले की, “पक्ष म्हणून काही संकट आली. अनेक अडचणीनंतर राजकीय पक्ष उभा केला, काही लोकांनी पक्ष फोडण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये दोन-तीन लोक प्रामुख्याने होते. राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढवणारे, सहकाऱ्यांमध्ये गैर विश्वास वाढवणारे दोन-तीन लोक होते. त्या दोन-तीन लोकांमध्ये कोण आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी पक्ष सोडला, ज्यांनी पक्ष फोडला. ज्यांनी समाजामध्ये अंतर वाढवण्याची भूमिका घेतली. ज्यांनी बीड जिल्ह्याचा आदर्श उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, अशा व्यक्तीला उद्याच्या निवडणुकीत पराभूत करा. राजेसाहेबांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा”, असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.

शरद पवार म्हणाले, आज बऱ्याच दिवसातून माझं परळीला येणं झालं. एक काळ असा होता, महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही आणि सहकारी विरोधी पक्षात होतो. त्या काळामध्ये या परळीने आम्हाला एक जीवाभावाचा सहकारी दिला. त्यांचं नाव रधुनाथराव मुंडे होतं. ते आमदार होते. जिल्ह्याच्या प्रश्नामध्ये लक्ष घालणारे नेते होते. माणसं जोडणं हा त्यांचा स्वभाव होता. दुर्दैवाने मुंबई शहरामध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला. तो मृत्यू कशामुळे झाला? हे माझ्या सारख्याला हे अजून देखील उलगडलेलं नाही. त्यांची आठवण आमच्या अंतकरणामध्ये कायमची राहिली. आणखी एका व्यक्तीची मला नेहमी आठवण होते. ते म्हणजे परळीची नगरपरिषद आणि त्याचं नेतृत्व राधाबाई यांच्याकडे होतं. त्या या शहराचं नेतृत्व करत होत्या. कष्ट करत होत्या. लोकांचे प्रश्न सोडवायच्या. एक लहान समाजाची महिला जबाबदारी मिळाल्यानंतर कसं काम करु शकते. त्याचं उदाहरण त्यांनी घालून दिलं 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here