मुंबई : अंधेरी पूर्व पोट-निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजप असा हा सामना रंगणार आहे.
“भाजपने अंधेरी पूर्व येथील पोट-निवडणूक लढवू नये, ऋतुजा लटके यांच्यासाठी ही जागा सोडावी,” असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे.
राज यांच्या या भूमिकेवर सर्वपक्षीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनीही त्यांचं मत व्यक्त केलं आहे. पण, हे करताना त्यांनी कुठेही राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाहीये.
उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडताना म्हटलं, “राजकीय जीवनात अनेक वर्ष निष्ठेने पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे अचानक आपल्यातून निघून जाणे हे प्रचंड वेदना देणारे असते. यामुळे पक्षाची हानी तर होतेच पण त्यांच्या कुटुंबीयांची अपरिमित हानी होते. स्व. रमेश लटकेंच्या अचानक जाण्याने लटके आणि शिवसेना कुटुंबावर असाच दु:खाचा डोंगर कोसळला. नियमाप्रमाणे पोटनिवडणूक लागली आणि शिवसेनेने ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्याचा निश्चय केला.”
ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्राचं राजकारण एका उच्च संस्कृती आणि मूल्यांवर आधारलेलं आहे. त्याची जपणूक शिवसेनेने सदैव केली. गोपीनाथजी मुंडे, आर.आर पाटील, भाजपच्या गिरकर ताई, यांच्या दुर्दैवी निधनानंतर शिवसेनेने समाजिक चळवळीतील एका कार्यकर्त्याच्या जाण्याने कुटुंबीयांच्या प्रति संवेदना व्यक्त करताना महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार पोटनिवडणुकीत दिला नाही.
“शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा त्यांनी दाखवला. त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांच्या बद्दल सदैव आभारी राहील. यशवंतराव चव्हाण, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक उंचीवर नेण्याचे काम केले आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे राजकारण अधिकाधिक नैतिक मूल्ये आणि संस्कृतीला जपण्याचे कार्य करेल अशी मला खात्री आहे.”