मुंबई, : सातारा आणि रायगड जिल्ह्यातील विविध शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांचे गेल्या चार-पाच महिन्यांचे थकलेले पगार न मिळाल्यास सोमवारपासून (ता.१७) काम बंद करण्याचा इशारा माथाडी कामगार नेते अविनाश रामिष्टे यांनी दिला आहे. नियमानुसार महिना संपल्यानंतर पुढील दहा तारखेपर्यंत कामगारांना पगार मिळणे आवश्यक असते. उलट सातारा जिल्ह्यातील कामगारांना २००८ ते २०१२ दरम्यानची महागाई भत्त्याच्या वाढीव फरकाची रक्कमही मिळाली नाही.
यासाठी अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांनी पाठपुरावा करूनही प्रशासन वेळकाढूपणा करते, असे रामिष्टे यांचे म्हणणे आहे.
रायगड जिल्ह्यातील ठेकेदारांचे कंत्राट तीन वर्षांपूर्वी संपूनही नवीन कंत्राट न झाल्यामुळे कामगारांच्या मजुरीत वाढ झाली नाही. तसेच त्यांना नवीन मजुरी दरही लागू करण्यात आले नाहीत. शासकीय योजनांची मजुरीदेखील त्यांना वेळेवर मिळत नाही. ही परिस्थिती न बदलल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.