कोपरगावच्या तहसीलदारांना भाजप पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन
कोपरगाव : दि. १७ ऑक्टोंबर २०२२
दिवाळी सणानिमित्त राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना फक्त १०० रुपयात एक किलो साखर, एक किलो चना डाळ, एक किलो रवा आणि एक लिटर तेल देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारने घोषित केलेली ही दिवाळी भेट पारदर्शक पद्धतीने सर्व लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.
यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोपरगाव येथील तहसीलदारांना सोमवारी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष डी. आर. काले, उपाध्यक्ष सोमनाथ म्हस्के, किरण सुपेकर, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष खालिकभाई कुरेशी, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष शंकर बिऱ्हाडे, शेतकरी मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश रानोडे, तसेच गोपीनाथ सोनवणे, अशोकराव लकारे, अर्जुन मोरे, रोहिदास पाखरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी सर्व शिधापत्रिकाधारक (रेशनकार्डधारक) नागरिकांना केवळ १०० रुपयात एक किलो साखर, एक किलो चना डाळ, एक किलो रवा आणि एक लिटर तेल देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी दिवाळीनिमित्त विशेष पॅकेज जाहीर केले असून, यामध्ये रवा, चना डाळ, साखर, तेल यांचा समावेश असणार आहे. ई-पास प्रणालीद्धारे त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण असून, यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा शिधा वस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
सरकारच्या या निर्णयाचा गोरगरीब जनतेला लाभ मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे कोपरगाव तालुक्यातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून सर्व शिधापत्रिकाधारकांना बायोमेट्रिक प्रणालीनुसार थंब घेऊन दिवाळी सणासाठी १०० रुपयात एक किलो साखर, एक किलो चना डाळ, एक किलो रवा आणि एक लिटर तेल देण्यात यावे. शासननिर्णयाप्रमाणे या मालाचे पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने वितरण करण्यात यावे, अशी मागणी भाजपने केली आहे.
कसलाही काळाबाजार न होता सर्व लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणासाठी शासनाने घोषित केल्यानुसार स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याचे वाटप करण्यात यावे आणि तसे आदेश तहसील प्रशासनामार्फत तालुक्यातील सर्व सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात यावेत, असेही भाजपने या निवेदनात म्हटले आहे.