शिवसेनेचा (उद्धव ठाकरे गट)उरण तहसील कार्यालयावर धडक मोर्चा.

0

आठ दिवसाच्या आत न्याय न मिळाल्यास शिवसेना खोपटे रोडवर चक्का जाम आंदोलन करणार.

उरण दि ८(विठ्ठल ममताबादे ) वारंवार जाणारी वीज,उरण मधील खराब रस्ते, पाच वर्षात एकदाही न झालेले आमसभा,वाहतूक कोंडी, आरोग्याचे प्रश्न,शासकीय कार्यालयातील अंधाधुंदी कारभार, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी,नशिली पदार्थांची खुलेआम विक्री,महिलांची असुरक्षितता, सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे, ग्रामसेवक तलाठी कार्यात हजर नसणे, शासकीय दवाखान्यात कर्मचाऱ्यांची कमतरता व औषधांचा तुटवडा या सर्व नागरी समस्या बाबत तहसील कार्यालयात व शासनाच्या विविध विभागात अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही, शासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेऊनही नागरिकांच्या समस्या सुटत नसल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत शिवसेना स्टाईलने थेट उरण तहसील कार्यालय धडक मोर्चा काढला.

 उरण शहरातील व ग्रामीण भागातील विविध नागरी समस्या संदर्भात यापूर्वी शिवसेनेने( उद्धव ठाकरे गटाने) अनेक वेळा पत्रव्यवहार केला. निवेदने दिली विविध अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या मात्र समस्या सुटले नाहीत. शेवटी शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक देण्याचा इशारा आठ दिवस अगोदरच प्रशासनाला देण्यात आला. तरीसुद्धा प्रशासनातर्फे शिवसेनेच्या कोणत्याही मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. प्रशासनाच्या कोणत्याही विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्याचे शिवसेना(उबाटा गट )जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहरातील गणपती चौकातील शिवसेना शाखा ते राजपाल नाका, कोट नाका या मार्गे पायी चालत जात निषेध नोंदवत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.यावेळी माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, माजी सभापती विश्वास म्हात्रे, महिला आघाडीच्या भावना म्हात्रे, ज्योती सुरेश म्हात्रे, मनिषा ठाकूर, रंजना तांडेल, तालुका संघटक बी. एन. डाकी, दिपक भोईर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, शिवसेना तालुका उपसंघटक रुपेश पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक रोहिदास पाटील, कोप्रोलीचे माजी उपसरपंच नीरज पाटील, कोप्रोली शाखाप्रमुख रवी म्हात्रे, कोप्रोली माजी शाखाप्रमुख आकाश म्हात्रे, अशोक घरत, श्याम मोकाशी, नंदन म्हात्रे, महेश कोळी, संतोष कोळी, लक्ष्मण ठाकूर, राजेश भोईर, अमिताभ भगत, मंगेश थळी, नारायण तांडेल, नितेश पाटील, नयनेश भोईर, लवेश म्हात्रे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

 यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर व तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांच्या शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार उद्धव कदम, विविध विभागाचे शासकीय अधिकारी यांना विविध समस्या विषयी जाब विचारला. व समस्या त्वरित सोडविण्यासाठी सर्वच शासकीय अधिकाऱ्यांना विनंती केली. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सर्व समस्या मांडल्या. तुम्हाला कामे जमत नसेल तर शिवसेना आपला स्टाईलने कामे करेल. गोर गरिबांना त्रास देऊ नका, त्यांचे कामे वेळेवर करा, नागरी समस्या तातडीने सोडवा अन्यथा तुमच्या खुर्च्या खाली करा. नागरी समस्या आठ दिवसात न सुटल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने प्रशासनाला उत्तर देईल अशा इशारा मनोहर शेठ भोईर यांनी  बैठकीत प्रशासनाला दिला. तहसीलदार उद्धव कदम यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवसेनेचे उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेत विविध समस्यांचा पाढाच त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमोर वाचला.जर समस्या आठ दिवसात सुटल्या नाही  किंवा जनतेला न्याय मिळाला नाही तर संपूर्ण खोपटा रस्त्यावर चक्का जाम करू. होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहिल असा इशारा भर सभेत संतोष ठाकूर यांनी प्रशासनाला दिला.

 या सर्व समस्या ऐकून घेतल्यावर वाहतूक कोंडी संदर्भात वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी पाच ते नऊ या  वेळे दरम्यान प्रमुख रस्त्यावर ट्रॅफिक होणार नाही व नागरिकांना कोणत्याही  प्रकारचा त्रास होणार नाही असे आश्वासन दिले. रस्त्याच्या दुरावस्थे बाबत व ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अनिल सांगळे यांनी सदर निकृष्ट कामाचे चौकशी करून अहवाल वरिष्ठाना कळवतो असे सांगितले. विजेच्या प्रश्नावर महावितरणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संदीप चाटे यांनी नागरिकांना कोणत्याही त्रास होणार नाही सर्वांना वीज वेळेवर देऊ,कोणाला काही तक्रार असल्यास ते आम्ही त्वरित सोडवू असे आश्वासन दिले. उरण मधील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांनी पोलीस विविध घटना संदर्भात चोवीस तास सतर्क असून कोणतेही अनुचित घटना घडू नये  याची काळजी घेत आहे. पोलीस जनतेसाठी, जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर आहे. चरस गांजा सारख्या नशिली पदार्थ विरोधात पोलीस प्रशासन तर्फे नेहमी कारवाई चालू असते. पुढेही चालू राहिल असे उत्तर दिले. निवासी नायब तहसीलदार महेश पाटील, पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी संतोष सिंग दाबेराव यांनीही सकारात्मक असे उत्तर दिले.शेवटी उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांनीही बैठकीत सकारात्मक प्रतिसाद दिला.सर्व नागरि समस्या आम्ही वरिष्ठाना कळवू. विविध समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.उरण मधील विविध नागरी समस्या सोडवण्याचा आमचा प्राधान्य आहे. आपल्या सर्व मागण्याचा नक्की विचार करू व त्यावर उपाययोजना करू.असे आश्वासन  तहसीलदार उद्धव कदम यांनी शिवसेनेच्या शिष्ट मंडळाला दिले. यावेळी शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना समस्या सोडवण्यासाठी निवेदन सुद्धा देण्यात आले.तहसीलदार उद्धव कदम यांनी आश्वासन दिल्यानंतर सदर धडक मोर्चा स्थगित करण्यात आला.शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध मागण्या आठ दिवसात मान्य न झाल्यास खोपटे रोड वरती तीव्र चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी प्रशासनाला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here