उरण दि. 3 (विठ्ठल ममताबादे )कोरोना काळात एसटीच्या फेऱ्या कमी करण्यात आले होते.यामूळे प्रवाशी वर्गांना प्रवास करताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. कोरोना संपल्यावरही मात्र बसेसच्या (एस टी च्या) फेऱ्या न वाढविल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह नोकरदार,कर्मचारी, व्यापारी तसेच शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थी वर्गाना बसत होता. उरण ते पनवेल व पनवेल ते उरण या मार्गावर प्रवाशी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. प्रवाशी संख्येचा विचार करता त्या प्रमाणात वाहनांची संख्या फारच कमी होती. उरण,पनवेल, दादर आदी मार्गावर वाहनांच्या (बसेसच्या ) फेऱ्या वाढविण्यात याव्यात याबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ऑगस्ट महिन्यात उरण बस डेपो (आगारात )निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत उरण बस आगाराचे डेपो मॅनेजर सतीश मालचे यांनी रात्रीच्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता तसेच रात्र पाळीवर काम करणारे नोकरदार यांच्या समस्या लक्षात घेऊन उरणहून पनवेलला जाण्यासाठी रात्री 9.30 वाजता गाडी सुरु केली आहे. ही गाडी (बस) रात्री 9.30 वाजता उरणहून पनवेलला जाण्यासाठी सुटेल.तसेच पनवेलहून उरणला येण्यासाठी रात्री 11.15 (सव्वा अकरा वाजता )बस सुटेल. उरण मधील प्रवाशी व पनवेलला जाणारे कामगार वर्ग, रसायनी, खोपोली, तळोजा येथे दुसऱ्या पाळीतील कामगार वर्ग, रात्र पाळीतील कामगार वर्ग यांनी या उरण बस डेपो (आगार) तर्फे सुरू केलेल्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकरी कामगार पक्षातर्फे तसेच उरण बस डेपो तर्फे करण्यात आले आहे.