शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी अटीशिवाय नुकसान भरपाई द्यावी

0

आमदार नरेंद्र दराडेकडून निफाड,येवल्यातील गारपीटीच्या नुकसानीची पाहणी

येवला, प्रतिनिधी……

 दुष्काळाच्या संकटात होरपळत असतानाच शेतकऱ्यांनी घेतलेले शेतातील थोडेफार पीक अवकाळीसह गारपेटीमुळे भुईसपाट झाले आहे.शासनाने यापूर्वीही दुष्काळी मदत तसेच खरीपातील नुकसानीची भरपाई दिलेली नाही.त्यामुळे आता कुठलेही निकष न लावता अटी व निक शिथिल करून पिकांच्या नुकसानीपोटी तात्काळ आर्थिक मदत वितरित करावी अशी मागणी आमदार नरेंद्र दराडे यांनी केली आहे.

मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस,गारपिटीमुळे व त्यानंतर येत असलेल्या धुई,ढगाळ हवामानामुळे शेतात उभे असलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या नुकसानीची विंचूर,सोमठाणे,थेटाळे,वेळापूर,कातरणी,विखरणी आदी गावांच्या परिसरात जाऊन आमदार दराडे यांनी पाहणी केली.जगन्नाथ शिंदे,अनिल शिंदे,विमल शिंदे,दत्तात्रय शिंदे,राजाराम दरेकर,सीताराम दरेकर,बाबाजी झाल्टे,नामदेव गोसावी, देविदास काळे,गंगाधर पिंपरकर,चंद्रकला नवले,रवी लोहकरे,आन्ना सोनवणे, समाधान कदम आदि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आधार देत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.निसर्गाचा सुरू असलेला प्रकोप शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडत आहे.यावर्षी खरिपात पावसाअभावी सर्व पिकांचे नुकसान झाल्यानंतर सरतेशेवटी झालेल्या पावसावर तसेच उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी कांदा, द्राक्ष आदी पिके घेतले आहेत.मात्र अचानक आलेल्या अवकाळी व गारपिटीने या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.गारपीट व अवकाळी दरवर्षीची आपत्ती झाल्याने हा प्रश्न विधीमंडळाच्या अधिवेशनात मांडून दरवर्षीच्या या नुकसानीवर शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तरतूद करण्याची मागणी करणार असल्याचेही दराडे यांनी म्हटले आहे. 

यावर्षी खरिपातील पावसाअभावी झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले.मात्र,येवला व निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही.त्यासाठी पर्जन्याच्या निकषाची अडचण आल्याचे सांगितले गेले.त्यामुळे पावसाअभावी नुकसान होऊनही शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही.त्यानंतर खरिपातील वनव्याची दखल घेऊन शासनाने दुष्काळ जाहीर केला.मात्र नैसर्गिक आपत्तीपोटी अद्याप कुठलीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही.एकीकडे शेतकरी निसर्गाच्या प्रकोपामुळे आर्थिक संकटात लोटला जात असून कर्जबाजारी होत आहे,त्यात घेतलेले पीकही निसर्गाच्या ह्या अवकृपेमुळे भुईसपाट होत असल्याने शासनाने ठोस निर्णय घेऊन तत्काळ मदत जाहीर करावी तसेच दुष्काळी अनुदान देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे अशी मागणीही दराडे यांनी केली आहे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here