मुंबई : “आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला गेल्यानंतर शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये असं साकडं पांडुरंगाला घातलं होतं. पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यासाठी विभागीय पातळीवर शेतकऱ्यांचे मेळावे घेतले जातील. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शेतकऱ्यांच्या पाठीशी शिंदे-फडणवीस सरकार आहे, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी शेतकऱ्यांसोबत दीवाळी साजरी केली. यावेळी ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यातून तीन शेतकऱ्यांना सहकुटुंब निमंत्रण देण्यात आलं होतं. या सर्व शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीवाळी साजरी केली. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रताप सरनाईक, आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते.
“सध्या दिवाळी सगळेजण साजरी करत आहेत. कोणी गडकिल्ले बनवत आहे तर कोण रांगोळी काढत आहेत. राज्यभर आनंदात दिवाळी साजरी होत आहे. शेतकऱ्यांनी कितीही संकटं आली तरी खचून जावू नये. सरकार शेतकऱ्यांसोबत आहे. आम्ही कायच शेतकरीराजा सोबत आहोत, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय या सरकारने घेतला. एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त नुकसानभरपाई शेतकऱ्यांना जास्त मदत केली. कृषि मंत्री आणि अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. अनेक प्रलंबित असणाऱ्या योजनांना मंजुरी दिली. त्यामुळे लाखो हेक्टकर जमीन ओलीताखाली येणार आहे. या सर्व योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. भूविकास बॅंकेची मोठी रक्कम माफ केली. सरकारने नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील धोडराज येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यानंतर त्यांनी मुंबईतील त्यांचे शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा येथे शेतकऱ्यांसोबत दीवाळी साजरी केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल
त्याआधीही मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे बोलताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल असं आश्वासन दिलं. “राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळेल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.