संगमनेर / चंद्रकांत शिंदे
शेतकऱ्यांनी शेती करताना विज्ञान आणि शेतीची सांगड घालावी. भाजीपाला आणि फळबागेत शेतकऱ्यांना ज्या अडचणी येतात त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील हॉर्टिकल्चर आणि वनस्पती शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.कृष्णा रेड्डी यांनी केले.
तालुक्यातील सोनोशी येथील प्रगत शेतकरी स्व.कारभारी चिमाजी गीते यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कारभारी शिवार प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षापासून सुरू केलेला कृषी विज्ञान पुरस्कार कर्नाटकच्या बेंगलोर येथील हाॅर्टीकल्चर विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.कृष्णा रेड्डी आणि पुणे जिल्ह्यातील ओतूरचे प्रगतशील शेतकरी अजित घोलप यांना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ सुधीर तांबे यांचे हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला त्यावेळी डॉ.रेड्डी बोलत होते. यावेळी आ.डॉ सुधीर तांबे म्हणाले की स्व.कारभारी गीते यांनी शेवटच्या श्वासापर्यंत शेतीवर नितांत प्रेम केले. एक हाडाचे शेतकरी म्हणून ते तालुक्याला परिचित होते. त्यांचा शेतीचा आदर्श आणि त्यांचे कार्य सदैव तरुणांना प्रेरणा देत राहील असे सांगत डॉ.तांबे म्हणाले की सोनोशी सारख्या दुष्काळी भागात ५० एकर कांदे आणि टोमॅटोचे उत्पादन घेणारे त्यांच्या सारखे शेतकरी जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात क्वचितच एखाद दुसरा शेतकरी असू शकतो. ते व्यक्ती म्हणून चांगले होते तसेच कार्यकर्ते म्हणूनही चांगले होते असे आ.डॉ तांबे यावेळी म्हणाले.ह.भ.प उद्धव महाराज चोले म्हणाले की स्व. कारभारी गीते यांच्या मनात प्रेम आणि आपुलकी होती. त्यांच्याकडे आलेल्या माणसाची ते आपुलकीने विचारपूस करीत असे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुले भाऊसाहेब, डॉ.लहानू तसेच जलसंपदाचे कार्यकारी अभियंता हरिभाऊ गीते या तीन मुलांनी आपल्या वडिलांचे कार्य पुढे चालू ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की स्व.कारभारी गीते यांनी शेतीबरोबरच शिक्षणालाही महत्त्व दिले. त्यामुळे त्यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. कारभारी दादा शिवार प्रतिष्ठान हे युवा शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल असा आशावाद जयश्री थोरात यांनी व्यक्त केला. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने डीआरडीचे शास्त्रज्ञ तसेच स्व.कारभारी गीते यांचे चिरंजीव डॉ. लहानू गीते यांना पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल ह.भ.प डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रगतशील शेतकरी अजित घोलप यांचे ही भाषण झाले. कार्यक्रमास आ. डॉ.सुधीर तांबे, ह.भ.प डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर,ह.भ.प उद्धव महाराज चोले, इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, डॉ.जयश्री थोरात, श्रमिक उद्योग समूहाचे प्रमुख साहेबराव नवले, सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, अमित पंडित, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य इंजि बी.आर चकोर, जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष इंजि. सुभाष सांगळे, सोसायटीचे अध्यक्ष भाऊसाहेब गीते, डॉ. लहानू गीते, नाशिकच्या जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता हरिभाऊ गीते, उपसरपंच राजू सानप, भाजपाचे सुदाम सानप यांच्या सह ग्रांमस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत घुले यांनी केले. डॉ.लहानु गीते यांनी स्वागत तर कार्यकारी अभियंता हरिभाऊ गीते यांनी आभार मानले. यावेळी कारभारी गीते शिवार प्रतिष्ठानच्या कॅलेंडरचे लोकार्पण करण्यात आले.